सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर जवळील सोनल वाईन्स या मद्य विक्रीच्या दुकानातून दिवसभरात जमा झालेली ३ लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करून लंपास केल्याची घटना रविवार दि.१९ रात्रीच्या सुमारास घडली.
राजगड पोलिसांच्या माहितीनुसार सोनल वाईन्स खेड शिवापुर ता.भोर या मद्य विक्रीच्या दुकानातून रात्री दुकान बंद करून कालेश्वर आगरिया व दीपक जगदाळे हे दोघेजण ३ लाख ७८ हजार रुपयांची रोकड घेऊन शेजारीच असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकी वर जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या तीन अज्ञातांनी पैशांची पिशवी पळवण्याचा प्रयत्न केला. कालेश्वर यांनी विरोध केला असता त्याच्यावर चोरट्यांनी पिस्तुलातून दोन गोळ्या फायर करून हातातील बॅग हिसकावून लंपास केली. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात ३ अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.