सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी येथील पुलाची उंची सात ते आठ फुटाने वाढवल्या प्रकरणी ग्रामस्थांनी पुलाचे काम पाडले आहे.आज ग्रामस्थांनी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांचेकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या नावाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की शेंडकरवाडी येथे पूर्वीचा निरा डावा कालव्यावर पुर्व पश्चिम वाहतुकीसाठी बांधकाम केलेला दगडी पुल होता, तो पुर्णपणे पाडून आता त्याचे जागी नविन पुलाचे बांधकाम चालले आहे व ते ७५% झाले आहे. याबाबत आमची तक्रार अशी की सदर बांधकाम चालू असलेला पुल पूर्वीच्या पुलापेक्षा कारण नसताना कॅनॉलच्या भरावापेक्षा ७ फुट उंच करण्यात आलेला आहे. संबंधीत अधिकारी यांचेकडे चौकशी केली असता ते म्हणाले या पुलाची डिझाईन आम्हाला अशी दिली आहे. त्यामुळे त्याचा उतार हि तितकाच दुर गेला आहे. म्हणजे ओलिताखालील चांगल्या प्रकारच्या पिकाऊ जमिनीत गेला आहे. वास्तविक पाहता इतक्या उंचीची गरज नाही. सदर उंची कमी करण्याकामी संबंधीतांना आदेश व्हावेत, हि विनंती करीत आहोत. त्याबाबत स्थळ पाहणी करण्याची कार्यवाही करणेबाबत संबंधीतांना सुचित करण्यात यावे. सध्या शेतात जाण्यासाठी कॅनॉल पास करताना, पायी जाणारे व वाहने यांना दोन कि. मी. चा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि श्रमही वाया जात आहे. हि दैनंदिन बाब आहे. याबाबतही आपणाकडून गैरसोय दूर करणे कामी सहकार्य व्हावे हि विनंती करीत आहोत. यावेळी शिवाजी शेंडकर, समर्थ शेडकर, निखिल शेंडकर, विकास शेडेकर, सुरेश शेंडकर, तुषार शेंडकर, किरण शेंडकर प्रदिप शेंडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.