सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदावरील विद्यमान संचालकांची एक वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे आता स्वीकृत संचालकपदी संधी मिळण्यासाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
मागील वेळी काँग्रेस व शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती. आता राष्ट्रवादीचे इच्छुकांना दरवाजे उघडले जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, कामगार संचालकाची लटकलेली निवडही स्वीकृतसोबत होणार का याचीही कार्यक्षेत्राला उत्त्सुकता लागली आहे.
सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोबरमध्ये पार पडली. १४ ऑक्टोबरला झालेल्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, काँग्रेस व शेतकरी कृती समितीच्या पॅनेलचे उमेदवार १८ हजारांच्या विक्रमी मतांनी निवडून आले होते. २१ जणांच्या निवडून आलेल्या संचालक मंडळात सहकार कायद्यानुसार दोन तज्ञ संचालकांना स्वीकृत पध्दतीने निवडता येते. संचालक मंडळाच्या मासिक सभेस तो अधिकार दिला असून सहकार, साखर कारखानदारीतील अभ्यासू व जाणकार व्यक्तीस निवडणे क्रमप्राप्त असते. मागील वर्षी २९ जानेवारीला शेतकरी कृती समितीचे अजय कदम यांची व काँग्रेसचे कार्यकर्ते तुषार माहूरकर यांची निवड झाली होती. त्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट पहात त्यांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याचे समजते. मात्र नवीन इच्छुकांनी आतापासूनच फिल्डींग लावायला सुरवात केली आहे. निवडणुकीत कुणालाही स्वीकृत संचालकपदासाठीचा शब्द पवारांनी दिला नाही त्यामुळे स्वीकृत यादीत कोण येणार याची उत्सुकता वाढली आहे. बारामतीच्या जिराईत भागाला यावेळी दोन संचालक मिळालेले आहेत. त्यामुळे बागाईत क्षेत्रातील निष्ठावंत व उमेदवारीपासून वंचित इच्छुकांचा विचार केला जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर व बारामती तालुक्याला एकेक जागा मिळणार की? बारामती व फलटण तालुक्यांना एक एक जागा मिळणार याकडे लक्ष लागले आहे.