सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बु ! प्रतिनिधी
बारामती तालुक्यात वनविभाग पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वाघळवाडी, मोरगाव, सुपे, कोऱ्हाळे, उंडवडी ठिकाणी वनविभागाला आगी लागून वन्य संपत्तीचे नुकसान झाले आहे. मात्र या वनविभागाचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या वनअधिकारी, वनरक्षक, वनपाल तसेच वनकर्मचारी हे फक्त शासनाचा भरमसाठी पगार घेण्यासाठी नेमले आहेत का? असा सवाल वन्यप्रेमी करत आहेत.
या दोन महिन्यात अनेक ठिकाणी आगी लागून वन्य संपत्तीचे आतोनात नुकसान झाले आहे. मात्र वन विभागाचा कोणताही अधिकारी अथवा वन कर्मचारी याठिकाणी फिरकलेला दिसला नाही. लागलेल्या आगी विझवताना मात्र वन्यप्रेमींची दमछाक होत आहे.
दोनच दिवसापूर्वी बारामती येथील गाडीखेल याठिकाणीच्या नियोजित बिबट्या सफारी विभागाला आग लागून तब्बल शंभर एकर वनक्षेत्र जळून खाक झाले तर वाघळवाडी येथे एक महिन्यांपूर्वी वनविभागात दोन एकर क्षेत्र जळून खाक झाले. काल देखील कोऱ्हाळे येथील कटिंग पूल याठिकाणी दुपारी एक वाजता वनविभागात आग लागली दुपारी चार वाजेपर्यंत तब्बल दीडशे ते पावणे दोनशे एकरांच्या आसपास वन क्षेत्र जळून खाक झाले. कोऱ्हाळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आयटी सेलचे अध्यक्ष प्रमोद पानसरे व एका स्थानिक युवकाच्या साहाय्याने ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही. दरम्यान प्रमोद पानसरे यांनी याबाबत फोनवरून वनविभागाला आग लागल्याचे कळवून देखील त्याठिकाणी वनविभागाचा साधा वनकर्मचारी देखील हजर राहिला नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
------------------------
काल दुपारी एक वाजता कोऱ्हाळे येथील वनविभागाला आग लागल्यानंतर मी वनविभागाशी संपर्क साधला परंतु त्या ठिकाणी कोणीही आले नाही. त्यानंतर मी वनविभागाच्या १९२६ या टोलफ्रि नंबर वर फोन केला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जानेवारी महिन्यात देखील मी अशा प्रकारे बारामती वनविभागात तक्रार नोंदवली होती. वास्तविक वन विभागातील कर्मचाऱ्यांना याबाबत काही घेणे देणे नसेल तर आपल्या कामात कसून करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही नुकसान भरपाई वसूल करावी.
प्रमोद पानसरे
अध्यक्ष- बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल