सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील प्रतिसोरटी सोमनाथ प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावत दर्शन घेतले. यावेळी हरहर महादेवच्या जयघोषाने परीसर दणाणून गेला होता. मध्यरात्री जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर आणि सोमेश्वरचे संचालक शैलेश रासकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.यावेळी विश्वस्त समिती अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सचिव राहुल भांडवलकर, सर्व विश्वस्त आणि भाविक उपस्थित होते. सलग आलेल्या सुट्यांमुळे भाविकांनी उत्साहात दर्शन घेतले. दिवसभरात सुमारे पन्नास हजार भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले असल्याची माहिती अध्यक्ष प्रताप भांडवलकर आणि सचिव राहुल भांडवलकर यांनी दिली. सर्परुपी सोमनाथ दर्शन दिल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला. पहाटेची पुजा नवनाथ उद्योग समुहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांच्या हस्ते पार पडली. दुपारी बारा वाजता वडगाव निंबाळकरचे पोलिस अधिकारी सचिन काळे यांच्या हस्ते सपत्निक पुजा करण्यात आली. भाविकांसाठी ओंकार फर्निचर आणि अन्य भाविकांनी प्रसाद वाटप केला. महावितरणचे अधिकारी हनुमंत जगताप यांच्या वतीने भाविकांसाठी ताक वाटप करण्यात आले. याशिवाय मंदिर परीसरातील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी केळी, खिचडी, फळे, दुध, ताक वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र होळचे प्रमुख डॉ. कर्णवीर शिंदे यांच्या सहकाऱ्याने कर्मचाऱ्यांनी भाविकांना आरोग्यसेवा दिली. सोमेश्वर देवस्थानच्या वतीने मोफत पार्किंग, पिण्याचे पाणी, भाविकांसाठी भक्तनिवासात राहण्याची सोय, मंदीर परीसरात स्वच्छता तसेच महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. बारामती आगाराच्या वतीने भाविकांसाठी जादा एसटी वाहनांची सोय करण्यात आली होती.मंदीर परीसर विविध खेळणी, मिठाई, प्रसाद, पानफुले, पाळणे, हॉटेल आदींच्या दुकानांमुळे फुलून गेला होता. यातून मोठी आर्थिक उलाढाल झाल्याने व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले. यात्राकाळात वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक योगेश शेलार आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.