सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
मागील तीन वर्षापासून बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाण्याचे संचालक शैलेंद्र रासकर पुरंदर तालुक्यातील गुळूंचे कर्नलवाडी परिसरात खडीमशीन प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत. ग्रामपंचायतला याबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी दिली नसतानाही प्रशासकीय मान्यता मिळवत संचालकांनी खडीमशींचा घाट घातला होता. या नियोजित खडीमशीनला गुळूंचे व कर्नलवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत कडाडून विरोध केला आहे.
महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र 'ब' दर्जा असलेल्या गुळूंचे व कर्नलवाडी गावच्या पश्चिम बाजूला डोंगरावर प्राचीन गुफेमध्ये बोलाईमातेचे जागृत देवस्थान आहे. राज्यभरात फक्त दोनच ठिकाणी बोलाईमातेची जागृत देवस्थान आहे. या देवस्थानच्या पायथ्याला मेंढपाळांच्या चराऊ जमिनी कवडीमोल भावात खरेदी करून मागील तीन वर्षापासून खडीमशीनचा घाट घातला जात आहे. मात्र या खडीमशीनच्या हदऱ्यांनी, होणाऱ्या स्फोटांमुळे बोलाईमातीचे गुहा धोक्यात येऊ शकते, हे लक्षात घेता ग्रामस्थांनी खडीमशीन या परिसरात होऊच नये असा ठराव शुक्रवार दि. ०३ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे. या ठरावाला दोन्ही गावचे प्रमुख व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने खडीमशीन या परिसरात होऊच नये असा ठराव संमत केला.
शुक्रवारी झालेल्या दोन्ही ग्रामसभेत खडिमशीन विषयावर ग्रामस्थांनी परखड प्रतिक्रिया दिल्या. यावेळी प्रशासक सुहास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पारपडली. यावेळी कर्नलवाडी येथे मावळते सरपंच सुधीर निगडे, माजी उपसरपंच धनराज कोंडे, विकास कर्णवर, लक्ष्मण वाघापूरे, सुरेश गोरगल, भागा महाणवर, पोलीस पाटील दिनेश खोमणे, तर गुळूंचे येथे मावळते सरपंच संतोष निगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश निगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नारायणभाऊ निगडे, यात्रा कमेटीपंच पोपट निगडे, हणुमंत निगडे, जयसिंग निगडे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.