सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
राज्य सरकार रुग्णांच्या आरोग्यासाठी सुसज्ज आरोग्य केंद्र,औषधे तसेच आरोग्य केंद्रातील यंत्रणा यावर भरमसाट खर्च करीत असले तरी रुग्णांना सेवा देणारे पन्नास टक्के अधिकारी,कर्मचारी कमी व वारंवार होणारा औषधांचा तुटवडा यामुळे भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये खेळ खंडोबा सुरूच आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उत्तमरीत्या मिळावी म्हणून राज्याचे आरोग्य विभाग नेहमीच सतर्क असते.मात्र मागील दोन वर्षांपासून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असल्याने तालुक्यातील नेरे,भोंगवली,आंबवडे,जोगवडी,नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्स, आरोग्य सेविका, आरोग्य स्टाफ नर्स, शिपाई तर अन्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने काही ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नागरिकांना(रुग्णांना) आरोग्यसेवा पुरवावी लागत आहे.परिणामी रुग्णांना सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याने सद्यस्थितीला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असल्याचे चित्र आहे.राज्य शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन लवकरात लवकर अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत तसेच औषधांचा पुरवठा लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----------------------
लसीकरण होईना--------
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने आरोग्य केंद्रांमार्फत सहा महिन्याने होणारे शून्य ते दीड वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण अनेक गावांमध्ये लसीकरण होत नसल्याचे चित्र आहे.
-------------------
वरिष्ठ कार्यालयाकडे रिक्त पदाविषयी अहवाल पाठवला
भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काही दिवसांपासून कर्मचारी अधिकारी यांची रिक्त पदे असल्याचे लक्षात घेता वरिष्ठ कार्यालयाकडे याचा अहवाल पाठवण्यात आलेला आहे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.