सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील बैलगाडा शर्यतीत अपघात होवून गंभीर जखमी झालेल्या बैलगाडा चालकाचे पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली असून बोरखळ येथील शर्यती दरम्यान झालेल्या अपघाती मृत्यूनंतर आता लोणंद येथील शर्यतीत झालेल्या मृत्यूमुळे गावोगावी होत असलेल्या बैलगाडा शर्यतींच्या सुरक्षीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लोणंद येथे दिनांक १० फेब्रुवारी रोजी 'केसरी भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन लोणंद निंबोडी रोडवर गोटेमाळ याठिकाणी करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीत सुमारे दोनशे बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. या शर्यतीं दरम्यान दि. १० रोजी दुपारच्या सुमारास बैलगाडी चालक अरुण विठोबा जाधव वय ५० रा . कोरेगाव ता . फलटण (मुळ गाव देऊर) हे बैलगाडीवरून पडल्याने मागे घसरत जाऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला या अपघातात त्यांच्या शरीराची एक बाजू पूर्णपणे जमिनीला घासत गेल्याने अरुण जाधव गंभीर जखमी झाले होते. शर्यतीत अरुण जाधव यांना अपघातानंतर लोणंद येथून पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांचा पुणे येथेच उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदर अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली नसल्याचे सांगण्यात आले असून याप्रकरणात पोलीसांकडून ठोस पाऊल उचलण्यात येऊन आयोजकांवर गुन्हे दाखल होणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .