फलटण ! पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रशांत रणवरे
 जातीवाचक शिवीगाळ करून, तसेच दमदाटी करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, संजय विष्णु राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संजय वसंत काळे व मित्र सुमित चोरमले हे १७ जानेवारी २०२३ रोजी सायं साडेचार वाजता फलटण तहसील कार्यालयाचे पाठीमागे भोंगळे बिल्डींगमधील कार्यालयात बसले होते. तेव्हा संजु काळे यांचा मेव्हणा संग्राम तुकाराम शिंदे यांनी फोन करुन सांगितले की, ‘जाधववाडी येथील सर्व्हे नं. ४५ या ठिकाणी तलाठी योगेश धेंडे, विजय संभाजी गाडे, संतोष बाळासाहेब बिचुकले व त्यांचे सोबत काही अनोळखी व्यक्ती जागेची पाहणी करुन पंचनामा करण्यासाठी आले आहेत. तसेच विजय संभाजी गाडे, संतोष बाळासाहेब बिचुकले हे वाद घालत आहेत.’ त्यानंतर संजु काळे, सुमित चोरमले जाधववाडी येथे गेले असता काळे हे गाडीतून उतरताच रस्त्यावर उभे असलेले विजय संभाजी गाडे (रा. नरसिंह चौक, रविवार पेठ फलटण) याने जातीवाचक हाक मारुन त्याने व संतोष बाळासाहेब बिचुकले (रा. भडकमकर नगर फलटण), सागर चव्हाण (रा. सोमवार पेठ फलटण) यांनी शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. संतोष बिचुकले यांनी हात धरुन पिरगळला व ते तिघे म्हणाले की, ‘तुझ्या वरती आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी अर्ज करुन तुला लाखो रुपयाचा दंड बसवू, तुझ्या विरुद्ध कुठे तक्रार करावयाची नसेल तर त्या बदल्यात तू आम्हाला पाच लाख रुपये दे आम्ही तुझा विषय संपवितो.’  
         या ठिकाणी तलाठी योगेश धेंडे हे आले. त्यांनी तुमच्या जागेत टाकलेल्या मुरुमाबाबत तक्रार आली आहे. म्हणून मी व पंच या ठिकाणी आलो आहे. तेथून जातेवेळी विजय गाडे, संतोष बिचुकले व सागर चव्हाण ‘हे तू आम्हाला पाच लाख रुपये देणार आहे किंवा नाही. याबाबत तुझा आम्हाला लवकरात लवकर निरोप कळव,’ म्हणाले. याप्रकरणी तिघाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे तपास करत आहेत.
To Top