सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'अळंबी लागवड तंत्रज्ञान' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना अळंबी उत्पादनामधून रोजगार निर्मिती व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे आयोजन केले होते. उदघाटन सोमेश्वर कारखान्याचे संचालक आनंदकुमार होळकर व तिरूपती बालाजी अॅग्रो प्रोडक्टसचे सीईओ संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. अळंबीच्या विविध प्रकरांविषयी, ढिंगरी अळंबीच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी व अळंबीचा आपल्या आरोग्याला असणाऱ्या फायद्याविषयी सासवडचे प्रा. निखिल गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संजय शिंदे यांनी बटन अळंबी उत्पादन व्यवस्थापन, वाहतूक, बाजारपेठ, या व्यवसायासाठी असणाऱ्या सरकारी योजना व अनुदान यांच्या विषयी सखोल माहिती दिली. कार्यशाळेत ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यशाळेचा भविष्यात उपयोग होणार असल्याचे मत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बनसोडे यांनी याप्रकारच्या पुढील उपक्रमांच्या आयोजनाची माहिती दिली. या कार्यशाळेसाठी विद्यार्थी विकास मंडळाचे प्रा. संतोष पिंगळे उपस्थित होते. अळंबीमधून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळत असल्याकारणाने जगभरात अळंबीची मागणी आहे हे लक्षात घेऊन शेतीपुरक व्यवसाय व उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून युवकांनी याकडे पहावे या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे मत वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख व या कार्यशाळेचे आयोजक प्रा. शुभम ठोंबरे यांनी प्रास्ताविकात केले. सूत्रसंचालन प्रा. माधुरी भांडवलकर यांनी केले. आभार प्रा. राजश्री शेळके मानले. कार्यशाळेसाठी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, सर्व संचालक मंडळ व शिक्षण संस्थेचे सचिव भारत खोमणे यांनी या शुभेच्छा दिल्या.