सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहरात अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे लक्षात घेऊन भोर नगरपालिकेने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच नगरपालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठी पे अँड पार्क चा नवीनच फंडा काढला आहे.
यामुळे बेशिस्त वाहन पार्किंगवाल्यांना चाप बसणार असला तरी अनेक तात्पुरत्या स्वरूपात वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांना पार्किंगचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. भोर शहरात बेशिस्त वाहन चालक तसेच वाहनांच्या पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिक अक्षरशा वैतागून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने पे अँड पार्कची योजना आखली असून या योजनेची अंमलबजावणी आठवडाभरात करण्यात येणार आहे.सद्या शहरातील राजवाडा चौक,बस स्थानक ,काळा गणपती चौक तसेच बजरंग आळी येथील परिसरात पे अँड पार्कची योजना राबविण्यात येणार आहे तर पुढील काळात पूर्ण शहरभर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी हेमंत केरूळकर यांनी सांगितले.