सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरूर : प्रतिनिधी
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवारी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यांने जाणाऱ्या पुजा जालिंदर जाधव या २२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना घडल्याने शेतकरी वर्गात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महिलेवर बिबट्याने हल्ला करीत येथून जवळच्या उसाच्या शेतात ओढत नेऊन तिच्या गळ्याभोवतीचा काही भाग खाल्ल्याने सदर महिला मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घोड कुकडी नदीच्या बेट भागात बिबट्याने मानवावर हल्ला करून ठार मारण्याची ही चौथी घटना आहे.
सदर महिला ही पुणे जिल्ह्यातील टाकेवाडी, कळंब (ता. आंबेगाव) येथील रहिवासी असून तिचे पती जालिंदर मारुती जाधव (वय २६) व दिर विश्वास बाळू जाधव (वय ३८) असे तिघे मोटरसायकलवर फाकटे ते कळंब गावी जात असताना बोंबे मळा परिसरात लघुशंके करिता थांबले असता या महिलेचा पती व दिराच्या डोळ्या देखत महिलेवर बिबट्याने हल्ला करीत उसाच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर दोघांनी आरडाओरडा झाल्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी शोध घेतला असता उसाच्या शेतात पुजाचा मृतदेह मिळून आला.