सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद ! प्रतिनिधी
पाडेगाव संशोधन केंद्राने दिलेल्या वाणांनी सध्या महाराष्ट्रातील नव्वद टक्के ऊसक्षेत्र व्यापले आहे. डॉ. भरत रासकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने चार-पाच वर्षात पाच नवे वाण दिले आहेत. त्यामधील फुले १५०१२ वाण दर्जेदार आहे. मात्र अशा संशोधन केंद्रांकडे राज्यसराकर, केंद्रसरकारकडून आर्थिक मदत होत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पाडेगाव (ता. खंडाळा) येथे पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर यांच्या निवृत्तीनिमित्त चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. रासकर लिखित आधुनिक ऊसशेतीविषयक पुस्तकाचे प्रकाशनही चव्हाण यांच्याच हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर होते. याप्रसंगी डी. लिट. पदवी मिळाल्याबद्दल तसेच साखर उद्योगात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने सोमेश्वर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, विराज निंबाळकर, सरपंच राहुल कोकरे, राजाभाऊ कोरडे, बिपिन मोहिते, डॉ. सुरेश उबाळे, डॉ. सत्तापा खरबडे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, मागील कृषीमत्र्यांनी, सर्व कृषी संशोधन केंद्र बंद करून टाकावीत आणि सगळं खासगीकरण करावं असा विचार केला गेला होता. त्यावेळी डॉ. रासकर यांनी पाडेगाव केंद्राने राज्याला काय काय दिले आहे शेतकरी हिताचे काम कसे केले आहे याचे सादरीकरण केले. त्यामुळे तो विषय थांबला. पंतप्रधानांनी शंभराव्या वर्षात स्वातंत्र्यदिन पदार्पण करत असताना भारत आधुनिक असावा असे मत मांडले आहे त्यासाठी विज्ञान व संशोधनाकडे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे..
पाडेगाव केंद्राची प्रशस्ती करताना चव्हाण म्हणाले, मागील चार-पाच वर्षात केंद्राने पडीक जमीन लागवडीखाली आणली. केंद्रसरकारकडून अनुदान मिळत नसल्याने बेणेविक्रीत पाचपट वाढ करून दोन कोटींवर महसूल नेला. केंद्र व राज्याचे पुरस्कार पटकावले. त्यामुळे रासकर यांच्यातील गुणवत्तेचा सरकारने उपयोग करून घ्यावा. डॉ. नेरकर यांनीही, केंद्रांच्या सुधारणा झाल्या नाहीत तरीही संशोधकांनी पोटतिडकीने काम केले असे मत मांडले.
जुन्नरचे शेतकरी विकास चव्हाण यांनी, रासकर यांना ऊस पंढरीचा पांडुरंग अशी उपमा दिली तर अॅड. विष्णुपंत हिंगणे यांनी, पाडेगाव संशोधन केंद्र हे तिर्थक्षेत्र असल्याचे कौतुक केले.
डॉ. आर. एल. भिलारे, डॉ. एस. के. घोडके, गिरीश बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश शिंदे यांनी स्वागत केले. विराज मदने यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. डी. एस. थोरवे यांनी आभार मानले.
जुन्नरचे शेतकरी विकास चव्हाण यांनी, रासकर यांना ऊस पंढरीचा पांडुरंग अशी उपमा दिली तर अॅड. विष्णुपंत हिंगणे यांनी, पाडेगाव संशोधन केंद्र हे तिर्थक्षेत्र असल्याचे कौतुक केले.
डॉ. आर. एल. भिलारे, डॉ. एस. के. घोडके, गिरीश बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश शिंदे यांनी स्वागत केले. विराज मदने यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. डी. एस. थोरवे यांनी आभार मानले.