सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ४८ वर शिंदेवाडी ता.भोर येथून पुरंदर तालुक्याकडे जाणारा मार्ग आहे. पुरंदर तालुक्यात दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग असून जड वाहनापासून अन्य सर्व प्रकारची वाहने रस्त्याचा वापर करतात. त्यांच्यासाठी याठिकाणी भुयारी मार्ग केल्यास सोयीचे होईल अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली.
या मार्गावरून जड वाहने त्याचबरोबर इतरही वाहने जातात तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थही प्रवास करत असतात. लहानमोठे अपघात होण्याचे मोठे प्रमाण असल्याने याठिकाणी भुयारी झाल्यास सर्वच प्रवाशांना सोयीचे होईल आणि अपघात होण्याचे प्रमाणही कमी होईल असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.शिंदेवाडी आणि गोगलवाडी येथील ग्रामस्थांनीही याबाबत मागणी केली असून या संदर्भात गोगलवाडीचे सरपंच अशोक गोगावले यांनी निवेदन दिले आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर शिंदेवाडी येथे भुयारी मार्ग मंजूर करावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.