कौतुकास्पद ! बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील 'या' पाच भावंडांचा नादच खुळा : चालू हंगामात सोमेश्वर कारखान्याला घातला दीड कोटींचा ऊस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील एकत्र पाच भावांच्या  कुटुंबियांनी कष्टाच्या जोरावर ७५ एकरात एकरी ६८ टनाच्या सरासरीने तब्बल दीड कोटी रुपयांच्या ऊसाचे उत्पादन घेतले आहे. परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
           कोऱ्हाळे ता बारामती येथील बंशीलाल भगत, विलास भगत, संजय भगत, सुनील भगत व डॉ यशवंत भगत हे पाच भावंडांचे एकत्रित कुटुंब. सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक सभासद असलेल्या भगत कुटुंबियांनी चालू हंगामात 'सोमश्वर'ला तब्बल पाच हजार दोनशे टन ऊस घातला. अलीकडच्या अनेक वर्षात एका कुटुंबाने एका हंगामात पाच हजार टन ऊस घालण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. विशेष म्हणजे एकरी ६७.४८ टनांची उत्कृष्ट सरासरीही त्यांनी गाठली आहे. यानिमित्ताने 'सोमेश्वर'च्या संचालक मंडळाने भगत कुटुंबियांचा व राबणाऱ्या मजुरांचाही सत्कार केला.
            स्व. रामचंद्र भगत हे 'सोमेश्वर'चे संस्थापक सभासद होते. १९७५ पासून २००७ पर्यंत ते सलग ३२ वर्ष संचालक होते. त्यानंतर सलग १७ वर्ष पुतणे सुनिल भगत संचालक आहेत. पुढील वर्षी संचालकपदाचा सुवर्णमहोत्सव करणारे कार्यक्षेत्रात पहिले कुटुंब ठरेल. एकत्र कुटुंबपध्दतीचा रामचंद्र भगत यांचा वारसा विलास व सुनिल भगत यांनी पुढे चालविला आहे. एकत्रात १७५ एकर क्षेत्र आहे. रामचंद्र भगत यांचे पाच हजार टन ऊस घालण्याचे स्वप्न होते. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांचे मागील वर्षीच अनपेक्षित निधन झाले. मात्र लगेचच दुसऱ्या वर्षी कुटुंबियांनी शेतात विशेष परिश्रम घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करत जणू श्रद्धांजलीच वाहिली.
             चालू हंगामात ७५ एकरावर आडसाली, सुरू, पूर्वहंगामी व खोडवा अशा चारही पध्दतीचा ऊस ठेवला होता. कारखान्याने नुकतीच शेवटची खेप नेली तेव्हा ५ हजार ११७ टन इतकी गोळाबेरीज झाली. शेवटच्या ट्रॅक्टरचे पूजन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गुलाबराव भगत, बन्सिलाल भगत, संजय भगत, शेवंताबाई भगत, सुशिला भगत, शारदा भगत उपस्थित होते.
सुनिल भगत म्हणाले, एकत्र कुटुंबपध्दतीमुळेच हे यश मिळू शकले. दोन वर्षापूर्वी कार्यक्षेत्रातील सर्वाधिक एकरी ऊस उत्पादनाचा पुरस्कार पटकावला होता. आता रामचंद्र भगत यांच्या स्मरणार्थ 'श्रीराम शेतीसमूह' स्थापन करून आधुनिक पध्दतीची शेती करत आहोत. फुले २६५, को ८६०३२, व्हीएसआय १०००१ या वाणांच्या गाळपात चांगली सरासरी मिळाली. फुले २६५ आल्यापासून एकरी उत्पादन वाढून कुटुंबातही भरभराट आली. त्यामुळे आमच्या चारचाकीला '२६५' हा क्रमांक विशेष रक्कम भरून घेतला. आमचे चुलते कै. भगत बापू यांचे ५ हजार टन उसाचे स्वप्न आज पूर्ण झाले. 
---
To Top