सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या मुख्य गेटवर झालेल्या अपघातात नुकताच एका ऊसतोडणी महिलेला आपला जीव गमवावा लागला.
अपघातासारखी गंभीर घटना घडूनही सोमेश्वर कारखाना प्रशासन, वडगाव निंबाळकर पोलिस व स्थानिक नागरिकांना तपास लागला नाही. याबाबत जाणीवपूर्वक गुप्तता पाळण्यात आली. ऊसतोड कामगार पोटासाठी सहा महिने कारखाना कार्यस्थळावर हमालाप्रमाणे ऊसतोड काम करत असतात मात्र त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी प्रशासन घेताना दिसत नाही. अगोदरच ऊस वाहतूक करणारी वाहने कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अल्पवयीन मुलांकडून ट्रॅक्टर व ट्रक चालविले जातात यावर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. वशिल्याने वाहने अपुऱ्या कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावतात मात्र गंभीर अपघात झाल्यानंतर संबंधित कुटुंबाला साधा विम्याचा आधार ही मिळत नाही. सोमेश्वर कारखाना येथे नुकत्याच झालेल्या अपघातात अनिता रमेश नेमाने या अतिशय गरीब कुटुंबातील महिलेचा म्रुत्यू झाला. या अपघाताला कोण जबाबदार असा सवाल यानिमित्ताने ऊसतोडणी कामगार विचारत आहेत. पोलिसांनी याबाबत मौन धारण केले. वास्तविक वडगाव पोलिसांनी तातडीने याबाबत गुन्हा दाखल करणे गरजेचे होते मात्र नेहमीच वेगवेगळी कारणे सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनीही या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही. यात प्रशासन नक्की कोणाला वाचवायचा प्रयत्न करत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. सोमेश्वर कारखान्यात या अगोदरही अशा प्रकारचे छोटे- मोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे मात्र त्याचीही वाच्यता कारखाना प्रशासन कोठे करत नाही. अपघात झाल्यानंतर संबंधित कुटुंबातील सदस्यांना धीर देत प्राथमिक उपचार आणि पुढील उपचारांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम पोलिस आणि कारखाना प्रशासनाने करणे गरजेचे आहे.
...............
दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्यभरात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जातो. यामध्ये सुरक्षित वाहतुकीचे नियम सांगितले जातात. मात्र यावर्षी हा सुरक्षा सप्ताह राबविला नाही. पर्यायाने दरवर्षी नविन येणारे वाहनचालक वाहतूक नियमांबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र गाळप हंगामात पहायला मिळत आहे.
----------------------
आता फक्त ऊसाने भरलेली वाहने सोमेश्वर विद्यालयाच्या वर्गातच लावायची राहिली आहेत.
कारखाना गेट ते ऊस वाहन तळ ....हा रस्ता आहे का मृत्यूचा सापळा....असा सवाल नागरिक विचारत आहेत. रोज हजारो शालेय मुले रोज या रस्ताने सोमेश्वर विद्यालयात ये जा करतात... पण कारखाना प्रशासनाला याच्याशी काय देणे घेणे नाही... शाळेच्या रस्त्यावर ऊसाने भरलेल्या उंचच उंच वाहनांची खड्डेमय रस्त्याने झुला घेत वाहतूक सुरू असते...पण आता हे कारखाना प्रशासनाला हे कोण सांगणार....! ज्या मैदानावर अनेक खेळाडू तयार झाले...तिथं कारखान्याने ऊसाची वाहने उभी केली....शाळेने दुसरे छोटे ग्राउंड तयार केले....ते सुद्धा करखान्याच्या उसाच्या वाहनांनी बळकावले....आता फक्त ऊसाने भरलेली वाहने शाळेच्या वर्गातच लावायची बाकी राहिली आहेत.