सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर कारखान्यातील ऊसाचे वजन करणाऱ्या वजन काट्यावरील एका कामगाराला सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवसातील एक तास अगोदर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
दि २८ रोजी सोमेश्वर कारखान्यातील वजन काट्यावर हा प्रकार घडला. विशेष म्हणजे गेली १८ वर्षे सोमेश्वर कारखान्यात ऊस वजन काट्यावरील आपली सेवा पूर्ण करून त्याच दिवशी सेवानिवृत्त होणार होते. पण सेवानिवृत्तीचा कार्यकाळ संपण्यासाधी या कामगाराला कारखाना प्रशासनाने निलंबित केले आहे. सदर कामगार गेले १८ वर्ष झाले ऊस वजन काट्यावर कामाला असून त्याने स्वतःच्या मुलाच्या नावावर दुसऱ्याच बोगस पासवर्ड घेऊन बैलगाडीची बोगस कार्डस्लिप घेऊन वजन काट्यावर २ टन ५४२ किलो ऊसाची अफरातफर केली. दि २८ रोजी महिना टनेज तपासणीत ही बाब उघड झाल्यावर संबंधित कामगाराला कारखाना प्रशासनाने निलंबित केले आहे. याबाबत मागे अशी काही घटना घडली आहे का याबाबत चौकशी सुरू आहे.