सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील आमराई भागात पूर्ववैमनस्यातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एक गंभीर तर दोन जखमी झाले आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत चौघांना अटक करण्यात आली आहे.
दि २ रोजी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी कोमल राहुल मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. चंदन अशोक गव्हाळे, तन्मय काकडे, अक्षय वाघमोडे, आकाश वाघमोडे (रा.आंबेडकर वसाहत, बारामती), आरती शंकर गव्हाळे, शंकर अशोक गव्हाळे (रा. आमराई, बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चंदन गव्हाळे, तन्मय, अक्षय व आकाश वाघमोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. १५ डिसेंबर २०२२ रोजी चंदन
अशोक गव्हाळे याला महेश सुनील खंडागळे यांनी फायटरने मारहाण केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल होता. या प्रकरणी खंडागळे याच्या विरोधात कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. खंडागळे यांना अटक करत, पंधरा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते, परंतु या कारवाईमुळे चंदन गव्हाळे याचे समाधान झाले नाही. त्याला स्वतःच महेश यास शासन करायचे होते. आपल्या वर्चस्वाला धक्का लागल्याची त्याची भावना झाली होती.
पोलिस कोठडीतून सुटल्यानंतरही खंडागळे हे भीतिपोटी घरी येत नव्हते. २ मार्च रोजी ते घरी आले. सायंकाळी ते बहीण कोमल मिसाळ, दाजी राहुल मिसाळ, वडील सुनील, आई आशा, भाऊ विनायक यांच्यासह घरी होते. यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी घरावर दगड विटा घेऊन हल्ला केला. खंडागळे यांच्या नातेवाइकांनी त्याला घरामध्ये लपून ठेवले. त्यावेळी चंदन व तन्मय यांनी धारदार हत्याराने महेशचे वडील सुनील खंडागळे (वय ५०) यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली. आशा खंडागळे, राहुल मिसाळ यांच्यावरही वार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्यासह इतर जखमींना रुग्णालयात नेले.
COMMENTS