सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या वतीने अनाथ, दिव्यांग व वंचित मुलांसाठी उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या विमल सूर्यवंशी, रोहिणी सावंत, रामेश्वरी जाधव आदी महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयाची स्वच्छता राखणाऱ्या महिलांना साडीचोळी करण्यात आली.
काकडे महाविद्यालयाच्या सभागृहात माजी जिल्हा परिषद सदस्या सविता काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी काकडे व प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते महिलांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य पांडुरंग सुपेकर, सुलभा काकडे, स्मिता काकडे, भारती काकडे, सुजाता भोईटे, प्रा. मेधा जगताप, प्रा. जयश्री सणस उपस्थित होते.
कऱ्हा वागज येथे मूकबधिर मुलांसाठी निवासी विद्यालय चालविणाऱ्या रामेश्वरी जाधव, पाडेगाव येथे वंचितांसाठी समता आश्रमशाळा चालविणाऱ्या चैत्राली सूर्यवंशी, मांगल्य शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष विमल सूर्यवंशी, वाघाळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळेच्या संचालक व मुख्याध्यापिका रोहिणी सावंत, सुपे येथील प्राजक्ता मतिमंद मुलांचे निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी सुपेकर, अनाथ मुलांचा आधार असलेल्या यशवंतराव मोरे आश्रमशाळेच्या शिक्षिका सुजाता कोकरे, पंडिता रमाबाई प्रबोधन संस्थेच्या संचालक स्मिता मोरे यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या शिक्षकेतर व स्वच्छता कर्मचारी छाया गलीयल, मालन मोरे, शारदा लोखंडे, सीमा भुजबळ यांचाही साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात रामेश्वरी जाधव म्हणाल्या, अनाथ, दिव्यांग मुलं सांभाळण्यासाठी केवळ शिक्षक किंवा दाई बनून चालत नाही तर त्यांची आई बनावं लागतं. मुलांचं मन सांभाळत त्याला आकार देणं हे सगळ्यात कठीण काम महिलाच उत्कृष्ट करू शकतात. प्राचार्य वायदंडे म्हणाले, उच्चभ्रू समाजाला जागं करण्याचं, प्रेरणा देण्याचं काम वंचितासाठी कार्य करणाऱ्या महिला करत आहेत.
डॉ. जया कदम म्हणाल्या, फक्त कागदावर समानता दिसते. स्त्रीच नव्हे तर प्रत्येक व्यक्ती माणूस आहे. कुठलीही विषमता अमान्य केली पाहिजे. सुत्रसंचालन प्रा. नीलम निगडे यांनी केले तर आभार प्रा. अर्चना शेडगे यांनी मानले.