सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री राम कृष्ण हरी, श्री विठ्ठल विठ्ठल..जय हरी विठ्ठलचा अखंड जयघोष करीत टाळ मृदुगाच्या गजरात शिरोळ नगरीतुन चैत्र वारीसाठी तिर्थक्षेत्र पंढरपुरला वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी शिरोळकरांनी दिंडी मार्गावर सडा रांगोळी घालून व फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.
पंढरपूर येथील चैत्र वारीच्या निमित्ताने गेल्या 9 वर्षापासून शिरोळ येथील गुरूप्रसाद इंडस्ट्रीजचे प्रमुख व उद्योगपती ह भ प हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे व इंगळे कुटूंबियांनी स्वखर्चातून वारकर्यांच्या पायी दिंडीचे आयोजन केले आहे. यावर्षी सुध्दा या दिंडीसाठी शिरोळ परिसरातील 350 वारकरी सहभगी झाले आहेत. रविवारी सकाळी श्री दादासाहेब इंगळे यांच्या निवासस्थानी न्यायशास्त्री राजाराम महाराज यांच्या उपस्थितीत विणा पूजन, पालखी पूजन व आरती होवून मान्यवरांच्या उपस्थितीत या दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी येथील श्री हनुमान मंदिर गावडे गल्ली, श्री ब्रह्म मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री लक्ष्मी मंदिर, चौकातील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर, श्री विठ्ठल मंदिर येथे आरती होवून ही पायी दिंडी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.
पायी दिंडी प्रस्थान समयी शहरातील नागरिकांनी रस्त्यावर सडा मारून, रांगोळी काढून पुष्पवृष्टी करत वारकर्यांचे स्वागत केले. मनोभावी पालखीचे पूजन करून या दिंडीला शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, भाजपा नेते अनिलराव यादव, संजय उर्फ संभाजी चव्हाण, पत्रकार बाळासाहेब माळी, पत्रकार चंद्रकांत भाट यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक यांनी पायी दिंडीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी या पायी दिंडी सोहळ्याचे ह भ प हणमंत उर्फ दादासाहेब इंगळे, सुनिल इंगळे, अनिल इंगळे, गुरूप्रसाद इंगळे, दिगंबर इंगळे व इंगळे परिसरातील सदस्यांनी उत्कृष्ट आणि नेटके नियोजन केले आहे. तर किरण माने, सर्जेराव माने, विलासराव गावडे, शंकर गावडे, भरत रोडे, तानाजी माने, संग्राम माने, उदय जगदाळे बाळासाहेब जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.