सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील बस स्टँडवर वाहतूक पोलीस गस्त घालत असताना चार चाकी टेम्पो पळून जाऊ लागल्याने पोलिसांना संशय निर्माण झाला.टेम्पोचा पाठलाग करून तपासणी केली असता १ लाख ९१ हजार १६० रुपयांचा विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू गुटखा पोलिसांनी जप्त करून गाडी मालकावर कारवाई केली.
पुणे येथून भोर शहरांमध्ये गुटखा विक्रीसाठी आलेल्या मारुती सुपरकॅरी टेम्पो चालकाची भोर वाहतूक पोलिसांनी नाक्यावर पळून जाताना पाठलाग करून तपासणी केली.यावेळी गाडीत ३ पांढऱ्या व ३ खाकी रंगाच्या गोणी त्यात विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू असे एकूण १ लाख ९१ हजार १६० रुपयांचा गुटखा व ४ लाखांची गाडी असे एकूण ५ लाख ९१ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.पोलिसांनी गाडी चालकावर गुन्हा दाखल करून संपूर्ण माल जप्त केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे,विजय नवले वाहतूक पोलीस सुनील चव्हाण करीत आहेत.