सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ऊसतोडीचे काम करून कारखान्याच्या दारात पोहचलेल्या महिलेचा भरधाव वेगात आलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर
कारखाना (ता. बारामती, जि. पुणे) येथे घडली आहे.
अनिता रमेश नेमाने ( वय ४५) रा. महेंद्रवाडी (ता. पाटोदा) असे मयत महिलेचे नाव आहे. अनिता नेमाने या अनेक वर्षांपासून ऊसतोडीचे काम करतात. नेमाने कुटूंब यावर्षीही ऊसतोडीच्या कामासाठी सोमेश्वरनगर कारखाना येथे गेले होते. दि. ११ मार्च रोजी शेतात ऊसतोडीचे काम करून ते बैलगाडी घेवून कारखान्याच्या दारात पोहचले. अनिता नेमाने या गाडीवरून खाली उतरून आपल्या कोपीकडे जायला निघालेल्या असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ऊसाचा ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. यावेळी त्या जागीच कोसळल्या. दरम्यान, ऊसाने भरलेल्या ट्रक्टरने त्यांना फरफटत नेले. यातच त्यांचा मृत्यू झाला. दि.१२ रोजी सकाळी महेंद्रवाडी (ता. पाटोदा) येथे अनिता नेमाने यांच्या स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, विवाहित मुली असा परिवार आहे. त्या व्यवसायीक अशोक नेमाने यांच्या चुलती होत.