सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
नीरा येथील महात्मा गांधी विद्यालयातील १९८० च्या बॅचचे पहिले रीयुनियन नुकतेच कोमल अॅग्रो फार्म्स, सोनके येथे पार पडले. आता रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर असलेली ही 'मुले' तब्बल ४३ वर्षांनी आपल्या सवंगड्यांना भेटली.
भेटीचा हा अनौपचारिक सोहळा खूपच हृद्य असा झाला. रयत शिक्षण संस्थेच्या या महात्मा गांधी विद्यालयामध्ये नीरेतील तसेच ५-६ किमी परीघामधल्या वाड्या-वस्त्यांवरून मुले शिकायला येत असत. शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक, दुकानदार तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांची मुले येथे शिकली. शिकणारे बहुतेकजण गरीब किंवा कनिष्ठ मध्यमवर्गातून येतात. संपूर्ण शाळा अनवाणी चालून करणारे ९० टक्के विद्यार्थी यामध्ये आहेत. हे सर्वजण जीवनात संघर्ष करून आज सुस्थितीमध्ये पोहोचलेले आहेत. वैद्यकीय, कृषी संशोधन, कृषीसंबंधित उत्पादने, पोल्ट्री, दुग्धव्यवसाय, शेती, शासकीय अभियंते, स्वतंत्र व्यावसायिक, पोलीस दल, सैन्य दल, कामगार, राजकारण, आरोग्य, कला अशा बहुविध क्षेत्रांमध्ये हे विद्यार्थी आज आपला ठसा उमटवत आहेत. आपले हे यश आपल्या सवंगड्यासोबत शेअर करण्याचा आनंद या सर्वांनी मनसोक्त लुटला.
१९८० च्या बॅचच्या या रीयुनियनचे आयोजन करण्यामध्ये सुदर्शन महाजन(जैन), यशवंत जगताप, रामदास डोईफोडे, रामदास लोखंडे, प्रमोद गवळी, रघुनाथ धायगुडे आणि मित्रमंडळींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबुतचे माजी. सरपंच राजकुमार बनसोडे यांनी केले. बबन गायकवाड यांची या समूहाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून अशोक गायकवाड यांची निवड झाली.
राजकुमार बनसोडे, बबन गायकवाड, अशोक गायकवाड, मिलिंद जोशी, दिलीप गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, अनिल गायकवाड, अशोक भगत, रामदास डोईफोडे, सतिश सोनवणे, रामदास लोखंडे, रघुनाथ धायगुडे, अशोक पोकळे, अशोक ताम्हाणे,, रामचंद्र ताम्हाणे, प्रमोद गवळी, यशवंत जगताप, दत्ता कदम, लाला कदम, गणपत यादव, जगन्नाथ मालुसरे, बापु जाधव, राजेंद्र भास्कर, श्रीकृष्ण गद्रे, राजकुमार शहा, दिलीप नेवसे, अंकुश थोपटे, कृष्णा कोळपे, भानुदास झगडे, भारत गायकवाड आणि सुदर्शन महाजन असे ३१ जण यामध्ये सहभागी झाले होते.
ज्या शाळेनं आपल्याला मोठं केलं त्या शाळेसाठी काही भरीव आर्थिक मदत करत राहण्याचा संकल्प उपस्थित विद्यार्थ्यांतर्फे या ठिकाणी सोडण्यात आला. पुन्हा भेटण्याचे ठरवून या कार्यक्रमाची सांगता झाली.