सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
ऊसाचे वाढलेले क्षेत्र आणि त्यातच अपुरी ऊसतोड यंत्रणा ही कारखाना प्रशासनासाठी जिकरीची बाब आसतानाही सोमेश्वर आणि माळेगाव या दोन्ही कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडला.
यावर्षी गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच ऊसतोड मजुर कारखान्यासाठी डोकेदुखी बनले होते. करार करून देखील अनेक ऊसतोड टोळ्या कारखान्यावर फिरकल्या नाहीत यामुळे अनेक ऊस वाहतुकदारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. ऊसतोड यंत्रणा कमी आल्याने परिणामी कारखान्यांवर ऊस कमी प्रमाणात आला. त्यामुळे आडसाली सभासदांचा ऊस तुटून जाण्यास उशीर झाला.
नेहमीच सोमेश्वर व माळेगाव या कारखान्यात ऊसदर आणि ऊस गाळप यात नेहमीच स्पर्धा दिसून आली आहे.या गाळप हंगामात नीरा खोऱ्यातील सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्यात ऊस गाळपात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. हंगाम बंद होताना सोमेश्वर ने १२ लाख ५६ हजार ७६८ मे. टन उसाचे गाळप केले आहे तर माळेगाव ने १२ लाख ५७ हजार ४६५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. माळेगाव ने सोमेश्वर पेक्षा ६९७ किलो जादा उसाचे गाळप केले असले तरी सोमेश्वर ने साखर उत्पादनात व साखर उताऱ्यात माळेगाव ला मागे टाकले आहे. सोमेश्वरने १२ लाख ५६ हजार ७६८ मेट्रिक टन गाळप केले. यातून १४ लाख ६५ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. ११.५० चा साखर उतारा राखत कारखान्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर माळेगाव ने
१२ लाख ५७ हजार ४६५ ऊसाचे गाळप करत १३ लाख २४ हजार ३०० पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
राज्यातील अग्रेसर असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ चा गळीत हंगाम मंगळवार (दि. २८) रोजी पहाटे बंद झाला. प्रथमच सोमेश्वर कारखान्याचा हंगाम मार्चमध्ये बंद झाला आहे. गत हंगामात कारखाना तब्बल सात महिने म्हणजेच मे पर्यंत सुरू होता. संपूर्ण उसाचे गाळप झाल्यानंतरच कारखाना प्रशासनाने मंगळवारी पहाटे हंगाम बंद करण्याचा निर्णय घेतला. सोमेश्वर कारखान्याने चालू हंगामात हंगाम बंद झाल्याने ऊसतोड कामगारांमुळे गजबजलेला कारखाना परीसर आता शांत होणार आहे. ऊसतोड कामगार दोन दिवसात गावी जाणार असल्याने परीसर ओस पडणार आहे. हंगाम संपल्यानंतर ऊसतोडणी कामगारांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
मंगळवारी मध्यरात्री 'सोमेश्वर' चे संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्यासह शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, योगेश पाटील, अजय काकडे, अशोक जगताप, रमेश जगताप, महेश जगताप, मुकादम बाजीराव सपकाळ, अशोक काळे, सोनाजी तुपे, कल्याण रंधवे, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी कामगार यांच्या उपस्थितीत गव्हाणीत नारळ टाकून हंगामाची सांगता करण्यात आली. हंगाम यशस्वीपणे बंद झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. कारखाना परिसरातील ऊसतोडणी कामगारांची गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. सोमेश्वर कारखान्याने विस्तारीकरण करीत नव्या प्रकल्पातून साखरेचे उत्पादन घेतले. पर्यायाने जवळपास आठ ते नऊ हजार मेट्रिक टन दररोज गाळप करीत कारखाना गाळपात आघाडीवर राहिला. संचालकमंडळ, अधिकारी, कामगार, उसवाहतुकदार यांच्या सहकाऱ्याने संपुर्ण उसाचे गाळप करत हंगामाची यशस्वी सांगता झाली.