सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
'स्पायसी' अन्नपदार्थांची फॅशन कमी होऊन आता घरगुती व ग्रामीण पध्दतीच्या अन्नपदार्थांकडे लोक वळत आहेत हे पाहून एका गृहिणीने कर्जत-राशीनमधील रेसिपीनुसार पिवळसर लोणचे तयार केले. चवीसाठी गावातील ज्या लोकांना खायला दिले. त्यांनी पुन्हा पुन्हा मागीतले. पुढे पाहुण्यारावळ्यांना नेऊन दिले. हळूहळू गावाबाहेरही मागणी वाढली. वाढती मागणी पाहून आता चक्क ३५ टन लोणचे निर्मिती करत आहे.
वाकी (ता. बारामती) गावातील भंडलकरवस्ती या आडमार्गी वस्तीतील अश्विनी पोपट जगताप या महिलेच्या हाताची ही चव परिसरासाठी चर्चेचा विषय बनली असून ही चव व्यवसायात परावर्तीत झाली आहे. या घरगुती सुरू केलेल्या व्यवसायाने आता बारामती, इंदापूर, फलटण, दहिवडी, खंडाळा, कर्जत, पुरंदर, वाई या आठ तालुक्यात लोकांच्या ओठावरील चव बनले आहे. अश्विनी ह्या कर्जतमधील भैरोबावाडी गावच्या. अर्थशास्त्रात एम. ए. झाल्या होत्या. लग्नानंतर प्राध्यापक पात्रता परीक्षांसाठी प्रयत्न केला. मुले, शेती सांभाळून ते होत नसल्याने निराश झाल्या नाहीत. त्यांनी घरगुती पध्दतीने मसाले तयार करून विकायला सुरवात केली. त्याला चांगली मागणी होती पण मुले चिमुरडी असल्याने मसाले व्यवसायाला मर्यादा आली. त्या कर्जतच्या. आईकडून पिवळसर, हिरवट लोणचे तयार करायला शिकल्या होत्या. बाजारपेठेत तर लालभडक आणि चटकदार लोणच्याची लोकांना सवय. त्यांनी घरगुती लोणचे बनवून गावातील जवळच्या लोकांना खायला दिले. त्या लोकांनी पुन्हा मागणी केली. मग शंभर किलो आंबे आणून त्याचे लोणचे बनविले आणि ते चक्क हातोहात संपले. पुढील हंगामात लोकांनी आगाऊ मागणी केल्यामुळे एक टन आंब्याचे लोणचे बनविले. त्याची गावातच सफाया झाला. मागील वर्षी आंब्याच्या हंगामात २२ टनांवर हिशेब गेला. त्यांचे पती पोपट जगताप एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांनी धडपड करून विक्रीसाठी लागणारे विविध परवाने मिळविले आणि मुलाच्या नावाने अथर्व लोणचे हा प्रकार सुरू केला. यावर्षी ३५ टन आंब्याचे लोणचे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. आता हळदी लोणच्याबरोबरच त्यांनी आंब्याचं लाल लोणचे, लिंबू मिर्ची लोणचे, मिक्स लोणचे ही उत्पादने देखील सुरू केली आहेत. त्यामुळे अश्विनी यांना आर्थिक प्राप्ती होऊ लागलीच शिवाय गावातील तीन महिला कायमस्वरूपी या व्यवसायात मदत करू लागल्या आहेत.
अश्विनी जगताप म्हणाल्या, कैरी गावरान, कडक आणि आंबट असेल तरच खरेदी करतो. ती एप्रिल व मे मध्ये मिळते. पण लोणचे आताच तयार करायला सुरवात केली आहे. मागील वर्षी चांगला आंबा फोडून वाळविला. त्यात मीठ व हळद टाकून खास अन्नपदार्थांसाठी बनविलेल्या कॅनमध्ये साठवून मुरविला. त्याचे लोणचे बनवत आहेत. यावर्षी परवाना घेतल्यामुळे दुकानांवर विक्रीला पाठवायला सुरवात केली आहे. संपूर्ण कुटुंबाची यात मदत होते आणि मलाही आयुष्याला अर्थ आल्यासारखं वाटतं.
---