सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
फाल्गुनी पोर्णिमेचा दिवस होळी पोर्णिमा म्हणून भारतांत प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशीं नांवें आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधीं एकवाक्यता नाहीं. वसंत ऋतूच्या आगमनासाठीं हा वसंतोत्सव चालू असतो असाही समज आहे. उत्तरेंतील लोक हा उत्सव कृष्णासंबंधी मानतात. बालकृष्णाला विषमय दुग्ध पाजणारी पूतना हिचें होळीच्या रात्रींच दहन करण्यांत आलें असा एक विश्वास आहे. महाराष्ट्रांतील लोक मानतात कीं, पूर्वी ढुंढानामक राक्षसीण लहान बालकांना फार पीडा देत असे, तेव्हां तिला हांकून लावण्यासाठीं बीभत्स शिव्या देऊन जिकडे तिकडे अग्नि निर्माण करण्याची बहिवाट पडली आहे. हा सण साजरा करण्याचे प्रकार ही निरनिराळे आहेत. या सणांत प्रकट होणारी अनीति व बीभत्सपणा हळूहळू नष्ट होऊन राष्ट्रवर्धक असें स्वरुप येण्यास सुरुवात झाली आहे. या दिवशीं मैदानी व मर्दानी खेळांच्या चढाओढी ठेवून एकमेकांत सामाजिक हितसंबंध निर्माण करण्याची प्रवृत्ति आजकाल वाढली आहे. होळीसणांत काही प्रांतात अश्लीलता कां शिरली असावी या प्रश्नाचें उत्तर शोधतांना श्री. काका कालेलकर मार्मिकपणें विचार करतात: - "होळी म्हणजे कामदहन. वैराग्याची साधना. विषयाला काव्याचें मोहक स्वरुप दिल्यानें तो वाढतो. त्यालाच बीभत्स रुप देऊन त्याला उघडा नागडा करुन त्याचें खरें स्वरुप समाजास दाखवून त्याविषयीं शिसारी उत्पन्न करण्याचा उद्देश तर नसेल ? सबंध हिवाळाभर ज्याच्या मोहांत आपण सांपडलों त्याची फजिती करुन, त्याला जाळून टाकून पश्चात्तापाची विभूति शरीराला चर्चून वैराग्य धारण करण्याचा उद्देश यांत असेल काय ?" आणि कामदहनाच्या कल्पनेवर आधारलेल्या या कल्पनेस पुराणांत आधार सांपडतो. मदनदहनानंतर शंकरांनीं आपल्या गणांना सांगितलें कीं, "फाल्गुन शु. १५ स मीं मदनास जाळलें आहे. तेव्हां त्याच दिवशीं सर्वांनीं होळी करावी."असे मानले जाते .
यंदाच्या वर्षी 6 मार्च आज रोजी होळी दहन आहे आणि 7 मार्च रोजी धुलीवंदन आहे.
*होळीचा पूजाविधि*
देशकालादिकांचा उच्चार केल्यावर
*'सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये'*
असा संकल्प करून, वाळलेली लाकडे व गोवर्या यांची रास करावी आणि ती विस्तवाने पेटल्यावर,
*'अस्माभिर्मयसंत्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।*
*अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदाभव ॥*
या पूजा मंत्राने 'श्रीहोलिकायैनमः श्रीहोलिकां आवाहयामि' असे आवाहन केल्यानंतर 'होलिकायैनमः' या वाक्याने आसन, पाद्य वगैरे षोडशोपचार देऊन, पेटलेल्या अग्नीला तीन प्रदक्षिणा घालाव्या. गायन, वादन, हास्य व मनःपूत बडबड ही सर्वांनी निःशंकपणे करावीत. या बाबतीत ज्योतिर्निबन्धग्रंथात असे सांगितले आहे की, शुद्ध पंचमीपासून वद्य पंचमीपर्यंतच्या ज्या तिथि पुण्यदायक आहेत, त्यातल्या दहा तिथि उत्तम असून, अनंत पुण्यकारक आहेत. या दिवसात लाकडाची चोरी करून, ती लाकडे पुनवेला चाण्डाळ अथवा बाळंतीण यांच्या घरातून बालकाकडून आणविलेल्या विस्तवाने पेटवावीत. होळी गावाबाहेर अथवा गावात करावी. राजाने वाद्ये वाजविल्यावर स्नान करून शुचिर्भूत व्हावे आणि पुण्याहवाचन केल्यावर पुष्कळ दाने देऊन होळी पेटवावी. नंतर दुधातुपाने ती विझवून, नारळ व महाळुंगे वाटावीत. ती रात्र-गायन, वादन नृत्य वगैरेत लोक घालवितात. पेटलेल्या होळीला तीन प्रदक्षिणा घालून, लोक शंखनाद (बोंब) करतात. बोंब मारणाराने ती दुष्टा राक्षसी तृप्त व्हावी असा लोकांचा त्यात उद्देश असतो. रात्री याप्रमाणे होळीचा उत्सव केल्यानंतर, प्रतिपदेच्या सकाळी चांडाळाला पाहून जो स्नान करतो, त्याचा पापनाश होऊन आधिव्याधींच्या पीदेपासून तो मुक्त होतो. रोजची अवश्यक कर्मे करून पितृतर्पण केल्यावर, होळीच्या राखेला सर्व दुष्फलांचा निरास होण्यासाठी जे वंदन करावे, त्याचा मंत्र असा-
'वन्दितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेणच ।
अतस्त्वं पाहिनो देवि भूते भूतिप्रदा भव॥'
होळीचा दिवस आणि तिच्या पुढचा करि नावाचा दिवस हे शुभकार्याला वर्ज्य करावेत. कारण होळी, ग्रहण, भावुका (वैशाखी अमावास्या) अयनसंक्रांतीचे दिवस व प्रेतदहन केल्याचा दिवस हे सारे व त्याच्या पुढचे करिनावाचे दिवस, हे सर्व शुभकार्यात वर्ज्य करावेत असे वचन आहे. ग्रहण, अयन, संक्रांति व प्रेतदहनाचा दिवस यात मध्यरात्रीच्या विभागाने पूर्वदिवस व करिदिवस यांचा निर्णय समजावा. फाल्गुनी पुनवेला मनुष्याने व्रतस्थ राहून, पुरुषोत्तम गोविन्दाला झोपाळ्यावर झोके द्यावेत व त्याचे दर्शन घ्यावे, म्हणजे त्याला वैकुंठप्राप्ति होते.
होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदते आणि इतरही अनेक लाभ मिळू शकतात असे मानले जाते .
---------------------
विशेष टिप : सदर वृत्ताद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा "सोमेश्वर रिपोर्टर" चा उद्देश नसुन वर्षानुवर्षे चालु असलेल्या सणांबाबत ची पार्श्वभूमी व पारंपारिक माहीती आधुनिक पिढीला ज्ञात व्हावी हाच उद्देश आहे. यातील बरीच माहीती ग्रंथ अभ्यासक अशोककाका कुलकर्णी,नेवासा यांचे संकलनातुन साभार
------------------
ॲड गणेश आळंदीकर
लेखक जेष्ठ विधिज्ञ व जेष्ठ पत्रकार आहेत