बारामती ! सोमेश्वर कारखान्याच्या ऊस वाहतूकदारांचे सात कोटी अडकले : 'सोमेश्वर'चा पुणे विभागात साखर उताऱ्यात पहिला नंबर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने ११.९२ साखर उतारा मिळवत पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोमेश्वर कारखान्याने पुढील हंगामात १५ लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.  सुरुवातीपासूनच गेटकेन उसासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यापुढील काळात गाळप हंगाम १५० ते १६० दिवसच चालणार असून कमी कालावधीत जास्तीतजास्त गाळप करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पुढील हंगामात कारखाना प्रतिदिन १० हजार मेटन उसाचे गाळप करणार आहे. विस्तारीकरण करून गाळप क्षमता वाढल्याने कारखान्याने सरासरी ८ हजार टन प्रतिदिन गाळप केल्याने ५२ दिवस अगोदरच हंगाम उरकला. पुढील हंगामासाठी सोमेश्वरकडे ४३ हजार ६२० एकराची नोंद झाली असल्याची माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
               सोमेश्वर कारखान्याच्या वतीने सर्वाधिक ऊस वाहतूक करणाऱ्या ऊसतोड कामगार व वाहतुकदार, मुकादम यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी जगताप बोलत होते.यावेळी संचालक राजवर्धन शिंदे, सुनिल भगत, शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, ऋषीकेश गायकवाड, ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे यावेळी उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की, ऑक्टोबर मध्ये हंगाम सुरू होऊनही यंत्रणा उपलब्ध न झाल्याने तसेच पावसामुळे हंगाम सुरू होण्यास सुरुवातीला वेळ गेला. जवळपास ९० टोळ्या आल्या नाहीत. कारखाना साखर उताऱ्यात आघाडीवर राहिला असून यापुढील काळात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली जाईल. गेल्यावर्षी डिस्टलरीच्या माध्यमातून साडेबारा कोटी रुपये नफा झाला. डिस्टलरीचे विस्तारीकरण लवकरच होणार आहे. सभासद, कामगार, ऊसतोडणी वाहतूकदार, ऊसतोड मजूर यांच्या सहकाऱ्याने हंगाम यशस्वी पार पडला याबद्दल जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. प्रत्येक संकटात कारखाना कामगारांबरोबर असून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. 

................
पुरुषोत्तम जगताप - अध्यक्ष सोमेश्वर कारखाना.

ऊसतोडणी कामगारांकडे ७ कोटी रुपये वाहतुकदारांचे अडकले असून ही रक्कम मिळवण्याचे आव्हान शेती विभागापुढे आहे. हार्वेस्टरसाठी सभासदांनी प्रयत्न करावेत. चालू वर्षी हार्वेस्टरच्या माध्यमातून १ लाख २४ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले. कोजन मधून ८ कोटी ४५ लाख ६६ हजार युनिट्स वीजनिर्मिती करण्यात आली तर ४ कोटी ६१ लाख ९० हजार युनिट्स वीजविक्री करण्यात आली. कारखान्याने १५८ दिवसात १२ लाख ५६ हजार मेटन गाळप करत १४ लाख ६७  हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 

To Top