सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे बाजार मैदानानजीक असलेल्या महालक्ष्मी ज्वलर्स दुकानात दागिणे पाहण्याचा बहाना करुन दरोडेखोरांनी दुकान लुटण्याचा प्रकार केला. यावेळी दुकानातील सायरन वाजल्याने दरोडेखोरांचा एकच गोंधळ उडाला. दुकानातुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात गोळीबार केला. मात्र ग्रामस्थांच्या तत्पर्तेमुळे त्यातील एकाला पकडण्यात यश आले. तर अन्य तीन जण पळुन गेले. ही घटना शुक्रवारी ( दि. ३१ ) सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान घडली.
मात्र पोलिसांनी स्वत: चक्रे फिरवुन अवघ्या २४ तासाच्या आत चारचाकी किया गाडी, एक आरोपी तसेच ६ काडतुसे तर दोन पिस्तुल ताब्यात घेण्यात यश आले. तर अन्य दोन जण फरार झाले आहेत.
यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने सापडलेला पवन जगदीश विश्वकर्मा ( वय २० रा. उत्तर प्रदेश ) या दरोडेखोरास पोलिसांच्या ताब्यात दिले. तर पहाटे प्रदिप भैय्यालाल बिसेन ( रा. गोंदीया, महाराष्ट्र ) याला पाथर्डी येथुन अटक करुन सुप्यात आणण्यात आले.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, अश्वनी जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली. बाजार मैदानानजीक असलेल्या सुयश सुनिल जाधव यांच्या महालक्ष्मी ज्वलर्स मध्ये अश्विनी सुयश जाधव ( वय ३१ , रा. सुपे ) यांनी दरोडेखोरांपैकी एकाला सोने दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकामागे एक असे दोन जण दुकानात आले. काही कळायच्या आत त्यांनी दुकानाचे शटर खाली घेतले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवुन दुकानातील सर्व सोने बॅगेत भरुन पळण्याच्या प्रयत्नात होते. दुकानाचे शटर उघडुन पळण्याच्या आतच अश्विनी हीने सायरन लावल्याने परिसरात जमाव एकत्र आला. यावेळी दरोडेखोर बॅगेत असलेल्या माल घेवुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना ग्रामस्थांनी त्यातील एकाशी झटापट झाली. यावेळी जमाव दिसल्याने दरोडेखोरांनी दुकाना बाहेर गोळी झाडली.
त्यानंतर बाहेर पळण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्यावर उभा असलेल्या सागर चांदागुडे यांने दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोराने स्वत: ची सुटका करुन घेण्यासाठी गोळी झाडली. यावेळी ती गोळी सागर याच्या जांगेवर लागली. तर दुसऱ्या दोन गोळ्यापैकी एक रस्त्यावरुन चाललेल्या अशोक बोरकर यांच्या पोटाला चाटुन गेली. तर तीसरी गोळी सुशांत क्षिरसागर यांच्या पायाला लागली. सुशांत हा सोन्याच्या दुकानात काम करणारा कर्मचारी आहे.
त्यानंतर पोलिस नाईक दत्तात्रय धुमाळ, लोभेश जाधव, नाना तरटे, नाजीर शेख, राजकुमार लव्हे, चंद्रशेखर जगताप यांनी दरोडेखोरांपैकी एकाला पकडण्यात यश मिळविले. त्याच्याकडेच सोन्याच्या बॅगेमध्ये सुमारे ११ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा माल होता. तो हस्तगत करण्यात आला. तर अन्य तीन जण ८३ हजार ४०० किमतीचा ऐवज घेवुन किया चारचाकी गाडीतुन फरार झाले.
यादरम्यान दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले. यामध्ये सागर दत्तात्रय चांदगुडे ( वय ३० रा. तरटेवस्ती, पानसरेवाडी ), अशोक भागुजी बोरकर ( वय ५५ रा. बोरकरवाडी ), सुशांत क्षिरसागर ( सुपे, ज्वलर्सच्या दुकानातील कामगार ) अशी तिघांची नावे आहेत. येथील साळुंके हॉस्पिटमध्ये एकावर उपचार चालु आहेत.
दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, विभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सलीम शेख अधिक तपास करीत आहेत.
......................................