बारामती ! मुरूम ग्रामपंचायतने करबुडव्यांची नावे थेट छापली बॅनरवर : मुरूम पाठोपाठ आता वाणेवाडी ग्रामपंचायत देखील आठ दिवसात बॅनरवर नावे छापण्याची शक्यता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरुम (ता. बारामती) ग्रामपंचायतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी थकित असलेल्या ग्रामस्थांची नावे थेट बॅनर छापून गावात लावली. ग्रामपंचायतीने घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीची थकित घरपट्टी व पाणीपट्टी भरली नसलेल्यांना यामुळे चपराक बसली आहे. मुरूम पाठोपाठ आता वाणेवाडी देखील या आठ दिवसात करबुडव्याची नावे छापणार असल्याच्या गोष्टीला वाणेवाडीच्या सरपंच गितांजली जगताप यांनी दुजोरा दिला आहे.
             मंगळवारी (दि.११) रोजी मुरूम ग्रामपंचायतीने वार्ड क्रमांक १ आणि ५ येथील थकबाकीदारांची नावे भैरवनाथ पारावर लावली. याठिकाणी नावे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. याबाबत ग्रामविकास अधिकारी शहाजहान बाणदार यांनी माहिती दिली. गावातील पाचही वार्डात थकबाकीदारांची नावे लावण्यात येणार आहेत. मुरुम ग्रामपंचायतीकडील सुमारे १५७८ खातेदारांकडे तब्बल ४३ लाख ३२ हजार रुपये थकित आहेत. बॅनर वर नावे लावल्यामुळे मंगळवारी पहिल्याच दिवशी २३ हजार थकित बाकी वसूल झाली.नावे आल्याने थकबाकीदार घरपट्टी व पाणीपट्टी भरतील अशी आशा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना आहे. 

         सरपंच संजयकुमार शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मासिक बैठकीत तसेच ग्रामसभेत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या अगोदर थकबाकीदारांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या असल्याचे बाणदार यांनी सांगितले. बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करण्यास असमर्थ ठरत असताना मुरुम ग्रामपंचायतीने थकबाकीदारांसाठी  अवलंबिलेले कडक धोरण चर्चेचा विषय ठरला आहे.

गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी सहकार्य करत थकित कर भरणे गरजेचे आहे. वारंवार सांगूनही ग्रामस्थ कर भरण्यास टाळाटाळ करतात यामुळे थकबाकी वाढत जाते परिणामी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार करणे ही अवघड होते.
To Top