जावली ! करंदोशीचे वीर जवान तेजस मानकर यांना अखेरचा निरोप : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : धनंजय गोरे
वीर जवान अमर रहे भारत माता की जय अशा घोषणांनी आज रविवारी  करंदोशी ता जावली या ठिकाणी मोकळ्या जागेत शासकीय इतमामात तेजस मानकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. 
                वीर जवान तेजस  मानकर नुकतेच भारतीय सैन्यदलात  दाखल झाले होते.प्रशिक्षण संपून त्यांची पंजाब येथील भटिंडा या ठिकाणी नेमणूक झाली होती.कर्तव्य बजावत असताना गोळी लागून त्यांना वीरमरण आले.ही बातमी समजताच करंदोशी गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली. शुक्रवारी रात्रीपासून त्यांचे पार्थिव येण्याची ग्रामस्थ वाट  पाहत होते.रविवारी सकाळी पाचवड महामार्ग येथून खास सजवलेल्या वाहनातून त्यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला.सरताळे ,म्हसवे ,कुडाळ सोनगाव भिवडी या गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या कडेला रांगोळी काढली होती.ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून वीर जवान यांना आदरांजली वाहण्यात आली.
           रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून आपल्या लाडक्या सुपुत्रला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गावकरी रस्त्याच्या कडेला उभे होते. दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली होती. अमर रहे हमारे तेजस मानकर अमर रहे च्या घोषणा देत अंत्ययात्रा करंदोशी गावात आल्यावर  कुटुंबीयांसह अवघे गाव शोकाकुल झाले होते. तेजस यांचे पार्थिव  करंदोशी येथील त्यांच्या घरी काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यानंतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर पार्थिव अंत्यविधीसाठी नेण्यात आले. या ठीकाणी पोलीस दलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ,आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे,जिल्हा परिषद माजी शिक्षण अर्थ सभापती अमितदादा कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार ,माजी सभापती सौ.जयश्री गिरी,अरुणा शिर्के,व्यसनमुक्ती संघाचे अध्यक्ष विलासबाबा जवळ,तहसीलदार राजेंद्र पोळ,विभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे,सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पकचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

       आमच्या कुटुंबाचा वारसा तेजसने पुढे नेला होता.मोठा मुलगा आर्मीमध्ये अधिकारी आहे. भाऊही आर्मीमध्ये सेवा बजावत आहेत. बारा एप्रिलला भटिंडा याठिकाणी झालेल्या घटनेनंतर तेजस यांच्या युनिटलाही अलर्ट करण्यात आले होते.तेजसची याठिकाणी ड्युटी लागली होती.कर्तव्य बजावत असताना फायरिंग कुठून कशी आली हे निष्पन्न झाले नाही.कोर्ट ऑफ इन्क्वारी पोलीस इन्क्वायरी सुरू आहे.ते थोड्या दिवसात समजेल.सर्वांचा आवडता लाडका असणारा  तेजस युनिटमध्ये लाडका छोटू या नावाने परिचित होता.त्याच्या जाण्याने सर्वांना दुःख झालेले आहे. आमचा आदर्श घेऊन तो सैन्यात दाखल झाला होता याचा आम्हाला अभिमान आहे.अशी भावना तेजस यांचे  वडिल लहुराज मानकर यांनी  माध्यमांशी बोलताना जडअंतकरणाने व्यक्त केली.
To Top