सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आपल्या खाजगी चार चाकी वाहनावर विधानसभा सदस्य अर्थात आमदार mla असल्याचा बोर्ड लावून एक महाभाग फिरवत होता. सासवड पोलिसांनी त्याला कार सह ताब्यात घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याला सहा हजार पाचशे रुपयांचा दंड सासवड पोलीस यांनी केला आहे. तर पोलिसांनी हा लोगो त्याच्या कारवरून हटवला असून तो जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यात काही चार चाकी वाहने गोलाकार स्टिकर लाऊन फिरत होते. त्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आणि मध्यभागी अशोक स्तंभ असे हिरव्या रंगाचे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस चिटकवलेले दिसून आले होते . पोलिसांनी त्या वाहनांचा पाठलाग देखील केला होता. परंतु ती वाहने मिळून आलेली नव्हते. आज शनिवारी सकाळी जेजुरी नाक्यावर नाकाबंदी सुरू असताना त्यांना यातील क्रेेटा कार मिळाली. त्या गाडीवर अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते. गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली असता गाडीमध्ये आमदार महोदय वगैरे कोणीही नव्हते. किंवा ही गाडी आमदार महोदयांच्या मालकीची देखील नाही. गाडीचे मालक ऋतुराज गायकवाड राहणार काळेवाडी हे असल्याचे त्यामधून स्पष्ट झाले . त्याच बरोबर या क्रेटा गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावलेली आढळून आली .त्याच बरोबर गाडीला ब्लॅक फिलमिंग केलेले आहे. चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नव्हता. पोलिसांनी ही गाडी पोलीस स्टेशनला आणून गाडीचा लोगो जप्त केला.तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६५०० रुपये दंड करण्यात आला आहे .
दरम्यान सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी अशा प्रकारचे लोगो लावणे बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय. कोणीही अशा प्रकारचे लोगो गाडीवर लावू नका. जर असे लोगो आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे त्यांनी म्हटलंय. ही कारवाई डीबी पथकाचे पोलीस नाईक पोटे ,पोलीस नाईक नांगरे, ट्रॅफिकचे पोलीस हवालदार शिंदे यांनी केली.