'सोमेश्वर रिपोर्टर'चा पाठपुरावा ! गुळुंचे-कर्नलवाडी येथील दगडखाणीची अकृषिक परवानगी रद्द : ग्रामस्थांच्या लढ्याला यश, सहा गावांना होता हवा व पाणी प्रदूषणाचा धोका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
गुळूंचे (पुरंदर) बोलाईमाजता मंदिरा नजिक नियोजित खडिक्रीशची अकृषिक (एन.ए) परवानगी नुकतीच रद्द केली आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिले. अकृषिक परवानगीच रद्द झाल्याने भविष्यात या ठिकाणी कोणताही औद्योगिक प्रकल्प उभारता येणे शक्य नसल्याने खाणकाम व्यवसायाला पायबंद बसला आहे. 
          गुळुंचे, कर्नलवाडी, थोपटेवाडी, पिंपरे, सुकलवाडी, पिसु या सहा गावांतील शेतकऱ्यांनी दगडखाणीला विरोध केला होता. या ग्रामस्थांच्या लढ्याला यश मिळाले. दगडखाणीच्या विरोधात लढा उभारणारे कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, यात्रा समितीचे पंच हनुमंत निगडे, राष्ट्रवादीचे अक्षय निगडे यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 
         येथील गट क्रमांक ५८६ मध्ये दगडखाण व्यवसायाचा परवाना मिळवला होता. यासाठी २४ हजार चौरस मीटर क्षेत्रावर रासकर यांना अकृषिक परवानगी देण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी प्रकल्प सुरू झाल्यास हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण तसेच नजीकच्या पाणी बंधाऱ्याला धोका असल्याचे म्हणणे ग्रामस्थांनी व्यक्त केले. या भागात मेढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न अनेक पशुपालकांनी उपस्थित केला होता. 
            प्रशासनाने यावर सकारात्मक कार्यवाही न केल्याने १७ लोक तीन दिवस उपविभागीय अधिकारी पुरंदर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. शशिकांत पवार, भगवान पवार, शिवाजी पवार, हनुमंत निगडे, जयसिंग निगडे यांनी या गटात अकृषिक परवानगी देताना सहहिस्सेदार यांची परवानगी घेतली नसल्याचे तसेच गटाचा फाळणीचारा झाला नसल्याचे नमूद करत उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे परवानगी रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. 
----------------------
खडीमशिन सुरू झाल्यास बोल्हाईच्या मंदिराला धोका होता. शेती नापिक होण्याची भीती होती. गावकरी एकजुटीने लढलो. यामुळे यश मिळाले. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे स्वागत करतो. आगामी काळात आम्ही गावात कोणतीही खाण होऊ देणार नाही. 
हनुमंत निगडे, पंच, यात्रा समिती, गुळुंचे. (आंदोलक)
To Top