सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील वालुबाई मळ्यालगतचा धोत्रे ट्रान्सफार्मर दोन महिन्यांमध्ये दोनदा जळाला असून नादुरुस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची हातात तोंडाला आलेली पिके जळून खाक झाली आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे मात्र विद्युत वितरण कंपनीच्या सुपे शाखेने याकडे कानाडोळा केल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
सुपे नजीक वालुबाई मळा येथील शेतकऱ्यांसाठी धोत्रे ट्रान्सफार्मर आहे. या ट्रान्सफार्मर वर साधारणत: २० ते ३२ वीज पंप असून मोठ्या प्रमाणात आकडे, चोरून वीज वापरणारे रहिवाशी व शेतकरी आहेत.यामुळे अधिकृत वीज पंप वापरणाऱयांवर अन्याय होत आहेत. या भागात जलजीवन मिशन अंतर्गत १४ गावांना पिण्यासाठी शुद्धजल योजनेचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे .या कामावरील मजूर व कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्यासाठी चालविला जाणारा वीज पंपच आकड्यावर चालविला जात असल्याने ट्रान्सफार्मर वरील अनावश्यक दाब वाढत आहे.धोत्रे नावाचा ट्रान्सफार्मर दोन महिन्यामध्ये दोनदा नादुरुस्त झाला आहे.हा ट्रान्सफार्मर बदलून अजून एक दुसरा ट्रान्सफार्मर बसविण्यासंदर्भात मागणी करण्यासाठी या भागातील शेतकरी सुपे येथील शाखा अभियंता रत्नदिप करे यांना भेटले असता, या भागाची पुर्णतः पाहणी करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले मात्र दीड महिना उलटूनही शाखा अभियंता करे ,लाईनमन कपिल पवार हे साधे या भागाकडे फिरकले सुद्धा नाहीत. या भागातील वायरमन विनायक काळखैरे यांनी खांबाची पाहणी केली मात्र ट्रान्सफार्मर बाबत फोन केला असता ते उचलत नाहीत किंवा प्रत्युत्तर देत नाहीत. यामुळे नवीन ट्रान्सफार्मर चा प्रश्न रेंगाळत पडला आहे. शेतकरी मात्र पूरता हवालदिल झाला आहे.
या संदर्भात शाखा अभियंता रत्नदीप करे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सध्या यात्रांचा हंगाम असल्याने ट्रान्सफार्मर बसवण्यासाठी गावांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे त्यामुळे सध्या ट्रान्सफार्मर उपलब्ध नाहीत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा चालू आहे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाल्यास तातडीने बसविण्यात येईल.
दरम्यान सध्या नादुरुस्त असणाऱ्या धोत्रे ट्रान्सफार्मरवर दाब वाढल्याने गेल्या सात ते आठ दिवसापासून या ट्रान्सफार्मर वर सतत धूर निघत आहे व जाळही पाहायला मिळत आहे हा ट्रान्सफॉर्मर वस्ती लगतच्या रस्त्याजवळ असल्याने तो फुटून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवीन ट्रान्सफार्मर बसविताना विद्युत दाबाचे विभागीकरण करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.