सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राज्यात भाजप सरकारच्या विरुद्ध महाविकास आघाडीची स्थापना झालेली असताना भोरमध्ये महाविकास आघाडीमध्ये जाणीवपूर्वक बिघाडी केली जात असल्याने भोर तालुका बाजार समितीची निवडणूक राजगड कृषी विकास पॅनलच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनिशी लढणार असून काँग्रेसची सत्ता कायमच राखणार असल्याचे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार संग्राम थोपटे बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,माजी सभापती बाळासाहेब थोपटे,माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे, व्हा.चेअरमन पोपट सुके,लहूनाना शेलार,माजी उपसभापती रोहन बाठे,संचालक उत्तम थोपटे,सुभाष कोंढाळकर,शिवनाना कोंडे ,राजाराम तुपे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
थोपटे पुढे म्हणाले दळभद्री युती करून विरोधक एकवटले असून पॅनल स्थापन केला गेला आहे. बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी काँग्रेसच्या बिनविरोध चार जागा झालेले आहेत.पुढील १४ जागांसाठी निवडणूक लागली असून विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी बाजार समितीवर काँग्रेसचीच एकहाती निर्विवाद सत्ता राहणार आहे.