सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध पार पाडली जाते. मात्र यावेळेस भारतीय जनता पार्टीच्यावतीने सर्व १८ जागांवर उमेदवार उभे करून मतदानाने उमेदवारांची निवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी भाजपला बिनविरोध निवडणूक नको असल्याचे नीरा शहर भाजपचे अध्यक्ष शामराजे कुंभार यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक परिस्थिती मागील काही वर्षापासून हालाखीचे आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक कशी पारपाडता येईल याबाबत प्रयत्नशील असतात. मागील पंधरा वर्षात तीन निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी, त्याचबरोबर विद्यमान आ. संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतरे यांनी सुद्धा नेहमीच सामंजस्याची भूमिका दाखवत नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी प्रयत्न केले. बारामती तालुक्यातून सुद्धा विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि पवार कुटुंबीयांना नेहमीच विरोध करणारे काकडे कुटुंबीय सुद्धा या निवडणुकीकडे सामंजने पाहत असतात आणि ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करतात. मात्र यावेळेस भारतीय जनता पार्टीने नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचा ठरवले आहे. या निवडणुकीमध्ये १८ उमेदवार उभे करण्याचा संकल्प भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. उद्या सोमवारी भाजपचे १८ उमेदवार अर्ज दाखल करतील असं भाजपच्या वतीने सांगण्यात येते आहे.
नीरा उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील पंधरा वर्षात तेरी भी चूप मेरी भी चूप या पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यामुळे या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास झाला नाही. शेतकऱ्यांना या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सध्या काहीच उपयोग होत नाही. तर निरा कृषी उत्पन्न बाजार समितीला कामगारांच्या पगारासाठी व्यापारी गाळ्यांचे येणाऱ्या भाड्या वर व पेट्रोल पंपावरील उत्पन्नावर अवलंबून राहावे लागत आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीला येतच नाही. पाठीमागील कारभाऱ्यांनी व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिले नसल्याचा हा परिणाम आहे. त्याचबरोबर शेतमाल विक्रीसाठी योग्य ते प्रयत्न न केल्याने बाजार समितीची दुरावस्था झाल्याचे म्हणत भाजपचे निराशहराध्यक्ष शामराजे कुंभार यांनी ही निवडणूक बिनविरोध न होता मतदान प्रक्रिया पारपडूनच केली पाहिजे असं म्हटलंय, तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने तरुणांना संधी दिली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता प्रथमच नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपची एन्ट्री होणार आहे. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने विजय शिवतारे यांनी स्वतंत्र लढण्याचा संकल्प केला आहे. मात्र पुढील काळात भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना एकत्र येऊन लढतात का हे पाहणे कौस्तुतेचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना या आघाडीचा वतीने ही निवडणूक लढवली जात असून अद्याप उमेदवारांनी अर्ज भरले नाहीत. उमेदवारांनी अर्ज खरेदी केले असले तरी पक्षश्रेष्ठ कडून येणाऱ्या आदेशाकडे ते डोळे लावून बसले आहेत. अर्थातच नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करण्यासारखे सध्या काहीच उरले नसल्याने कार्यकर्ते या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर जाण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते. सोमवारी या बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून तोपर्यंत तरी या बाजार समितीच्या निवडणुकीविषयी सस्पेन्स वाढलेला आहे.