इंदापूर ! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिवसेना-भाजप युतीचे सरकार मजबूत : हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुक्याच्या विकासाला गती मिळेल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिवसेना-भाजप सरकारच्या घटनात्मकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तेसाठी अनैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या महाविकासआघाडीला ही जोरदार चपराक आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुरुवारी (दि.11) दिली.
              ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपविला आहे, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून असा निर्णय येणे अपेक्षित होते. शिवसेना-भाजप सरकार हे विधानसभा निवडणूकीत बहुमताचा कौल मिळालेले जनतेच्या मनातील सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली राज्यातील शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार हे गतिमान सरकार म्हणून गेल्या नऊ-दहा महिन्यामध्ये ओळखले जाऊ लागले आहे. या सरकारने विकासाची गंगा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक धाडशी निर्णय घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे माध्यमातून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी निधीचा ओघ सुरू असल्याने महाराष्ट्र राज्य हे देशात प्रगतीपथावर राहील असा विश्वास यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 
             इंदापूर तालुक्यामध्ये तसेच पुणे जिल्ह्यात विकास कामासाठी शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून गेल्या नऊ महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती निधी मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सरकार अधिक मजबूत झाले असून, आगामी काळात इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील पाटील यांनी दिली.
__________________________
To Top