पणदरे : प्रतिनिधी
पणदरे परिसरातील श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय व्हि .डी. अण्णा जगताप यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याने प्रेरित होऊन हनुमंतराव गोविंदराव शेडगे रा. कुरणेवाडी यांनी आपल्या स्वर्गीय पत्नीच्या स्मरणार्थ बहुजन समाजातील मुला मुलींच्या शैक्षणिक विकासासाठी एक आर्थिक मदत म्हणून अकरा लाख रुपयाची ठेव पावती केली.
त्यातून येणाऱ्या प्रतिवर्षी व्याजापोटीच्या रकमेतून स्वर्गीय सौ ताराबाई हनुमंतराव शेडगे शिष्यवृत्ती योजना प्रथमच बारामती तालुक्यात श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सुरू केली. या शिष्यवृत्तीतून प्रतिवर्षी ६० टक्के मुली व ४० टक्के मुलांना प्रोत्साहन पर शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येणार आहे .सध्याच्या धावपळीच्या युगात मी आणि माझे कुटुंब एवढाच माफक विचार न करता शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या श्री हनुमंतराव गोविंदराव शेडगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरीब होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तहायात शिष्यवृत्ती योजना आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ सुरू करून एक सामाजिक आदर्श नवीन पिढीला घालून दिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळ भिकोबा नगर संस्थेच्या वतीने हनुमंतराव गोविंदराव शेडगे यांचा नुकतेच विद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष अरविंद जगताप व संस्था सचिव शिवाजीराव जगताप ,ज्येष्ठ संस्था सदस्य नानासाहेब जगताप, रामचंद्र जगताप यांच्या उपस्थितीत संस्था स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नितीन सिद्राम शेडगे वरिष्ठ अभियंता रस्ते बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन , प्राथमिक शिक्षक काकासो काळभोर, कमलाकर काळभोर, के वाय आबा जगताप , विष्णुपंत जगताप ,राजेंद्र जगताप, शिवाजीराव कोकरे, रामचंद्र मोरे, संपतराव मोटे, शरद जगताप परिसरातील ग्रामस्थ पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार पवार यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले आणि आभार पिसाळ डी एस यांनी मानले.