सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : प्रतिनिधी
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९२.१६ टक्के चुरशीने मतदान झाले. बाजार समितीच्या ११ जागेसाठी २१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. दरम्यान, मतमोजणी निकालानंतर सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास विकास आघाडीने एकतर्फी बाजी मारली तर विरोधी भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडाला.
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिरोळ तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी
मोट बांधून राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक बिनविरोध होण्याकरिता मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील, पंचगंगा साखर कारखान्याच्या माजी चेअरमन सौ रजनीताई मगदूम, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील ,दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव ,शेखर पाटील,
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक, माजी सभापती भालचंद्र कागले
यांच्यासह अन्य नेते मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
बाजार समितीवर आर्थिक बोजा पडू नये आणि निवडणूक करून बाजार समितीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अर्ज माघारीनंतर या पॅनलचे ७ संचालक बिनविरोध निवडून आले.
मात्र भारतीय जनता पार्टीचे शिरोळ तालुका अध्यक्ष राजवर्धन नाईक -निंबाळकर, माजी तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे ,दलितमित्र अशोकराव माने ,भाजपाचे पोपट पुजारी, अन्वर जमादार यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा निश्चय केला. त्यामुळे सोसायटी सर्वसाधारण गटातील - ७ , सोसायटी भटक्या जाती- जमाती मुक्त गटातील- १ सोसायटी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातील १ आणि ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातील २ अशा ११ जागे करिता ही निवडणूक झाली
प्रचारादरम्यान दोन्ही पॅनेलच्या वतीने मतदाराच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका सांगून मतदान करण्याचे आवाहन केले होते. विशेषत: सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनलने बाजार समितीला गत वैभव प्राप्त करून देणे , सुसज्ज शेतकरी भवन बांधणे , मंजूर असलेल्या पेट्रोल पंप सुरू करणे तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयी- सुविधा पुरवणे हा विकासात्मक अजंठा घेऊन निवडणूक लढवली.
तर केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. बाजार समितीला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून बाजार समितीचा विकास करू अशा भूमिकेवर भाजप प्रणित पॅनेलने प्रचार करून या निवडणुकीत रंगत आणली होती. त्यामुळे रविवारी ११ जागेसाठी चुरशीने 92 .16 टक्के मतदान झाले.
सोसायटी गटातील १९१० मतदारांपैकी १७४१ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत गटांमध्ये ६६८ पैकी ६३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणीनंतर सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने सर्व जागा जिंकून बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान कुरुंदवाड येथे ३ शिरोळ येथील २ तसेच जयसिंगपूर येथील २ अशा सात केंद्रावरती मतदान झाले. मतदान केंद्रावर दोन्ही बाजूचे उमेदवार व समर्थक येणाऱ्या मतदारांचे स्वागत करीत होते.
रविवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान शांततेत पार पडले. विशेषत: सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचे मतदार समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक यांच्यासह नेते मंडळींनी मतदान केंद्रावर भेटी देऊन मतदाराशी संवाद साधला. तर विरोधी भाजप प्रणित पॅनलचे प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक- निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी व अन्य कार्यकर्त्यांनी मतदान स्थळी भेटी दिल्या.
------------
बिनविरोध उमेदवार असे-
(सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी पॅनेल )
सोसायटी महिला राखीव गट- सौ दिपाली सतीश चौगुले (उदगाव) , सौ माधुरी बाबासो सावगावे (कुरुंदवाड) , ग्रामपंचायत अनुसूचित जाती -सिद्राम दत्तू कांबळे (नांदणी),
ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल -किरण कल्लाप्पा गुरव (टाकवडे ), व्यापारी व आडते गट- प्रवीणकुमार मेघराज बलदवा व दादासो बाळकू ऐनापुरे (जयसिंगपूर ), हमाल व तोलाई गट - भगवान भीमराव पाटील (जयसिंगपूर)
---------
विजयी ( सत्ताधारी ) उमेदवारांना मिळालेली मते अशी--
सोसायटी सर्वसाधारण गट -
सुरेश शिवगोंडा माणगांवे १४३४ ( दानोळी) रामदास ईश्वरा गावडे १४७४ (शिरोळ ), मुजम्मिल खादर पठाण १४१७ ( आलास), विजयसिंह नारायण देशमुख १४४४ (शिरोळ), सुभाषसिंग गोपालसिंग रजपूत १३६३ (मौजेआगर), महावीर सातगोंडा पाटील १४०२ ( हसुर) , शिवाजी बाळासो चव्हाण १४४० (शिरोळ) ,
सोसायटी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी सोसायटी गट - दऱ्यांप्पा बाबू सुतार १४४० (दत्तवाड) ,भटक्या जाती व जमाती- चंद्रकांत कृष्णा जोंग १४८३ (कुरुंदवाड) ,ग्रामपंचायत सर्वसाधारण गट - आण्णासो भीमू पाणदारे ५०० (अकिवाट) संजय नायकू अणुसे ५४६ ( तेरवाड)
--------
पराभूत विरोधी आघाडी उमेदवारांना
मिळालेली मते अशी-
सोसायटी सर्वसाधारण गट -सुनील देबाजे २१३, वैभव कोळी २५९ , राजाराम कदम २२१ , शशिकांत कोकाटे २०४ ,अन्वर जमादार २०६, सुनील देबाजे ११३ ,कलगोंडा पाटील २४५, बाबगोंड पाटील १५२, सयाजी पाटील २०५ दत्तात्रय कोळी १४०
& मतमोजणीवेळी मतपेटीतून मिळालेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, श्री जोंग साहेब, कारभार नेटका झाला पाहिजे !
& दुसऱ्या एका चिठ्ठीत म्हटले आहे की, नेते तुम्ही एकत्र होताय. पण खाली कार्यकर्त्यांची कुचुंबना होते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. खाली कार्यकर्ते डोके फोडून घेत आहेत,,,,,,