सोमेश्वर रिपोर्टर टीम------
संपादकीय : महेश जगताप
कोर्टाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली आणि सगळ्या महाराष्ट्रात भिर्रर्र..झाली. पण ही भिर्रर्र उभारत्या पिढीला बरबाद तर करत नाही ना? याकडे पाहणे गरजेचे आहे.
यामध्ये वय १४ ते ३० वर्षामधील तरुण वर्ग जास्त ओढला जात आहे. ज्याला अजून मिसरुट पण फुटलं नाही.ते पोरगं शाळा सोडून शर्यतीचं मैदान गाठतयं.. हे थांबणे गरजेचे आहे. हायकोर्टाने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी उठवल्यापासून बैलगाडा शर्यतींवर राजरोसपणे लाखोंचा जुगार खेळला जातोय. प्रशासनाकडून कधी दाखवण्यापुरती जुजबी कारवाई केली जातेय तर कधी अर्थपूर्ण दुर्लक्ष करून या अवैध प्रकाराकडे डोळेझाक केली जातेय.
मुंबई हायकोर्टानं २०१७ साली बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मागील काही महिन्यांपासून या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु झाल्या असून त्यापासून मोठ्या आर्थिक उलाढाली होत असल्याचे दिसून येत आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवताना या शर्यतींमध्ये जुगार खेळू नये किंवा पैशांवर शर्यती लावू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या शर्यतींची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असताना काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्याच अटीच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रास शर्यत भरविण्यात येत असून त्यावर लाखो रूपयांचा जुगार खेळवला जात आहे.
शर्यतीवर बंदी असतानादेखील एखाद्या निर्जन माळरानावर हौशी गाडा मालक अशा शर्यती घेत आपला शौक पुरा करत होते. मात्र बंदी उठल्यानंतरच्या काळात हा प्रकार खुलेआम होतोय. एखाद्या यात्रा ,जत्रेत तसेच एखाद्या मोठ्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठी बक्षीसे लावून अशा शर्यतींचे आयोजन केले जातेय. मात्र या बक्षीसाच्या रकमेपेक्षा मोठ्या रकमेचा सट्टा प्रत्येक फेरीत लावला जातो. यावरून मोठी आर्थिक उलाढाल तर होतेच पण अनेकदा मोठे वादाचे प्रसंग देखील उद्भवतात.अनेक बैलगाडा मालकांसाठी या शर्यती प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यातून अगदी गोळीबार झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. बैलगाडा शर्यत ही प्रचंड प्रतिष्ठेची झाल्याने ती जिंकण्यासाठी समोच्याला धमकावणे ,आमिष दाखवणे आदि प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
--------------------
बैलगाडा मालकाचा शौक चालकांसाठी ठरतोय जीवघेणा
सातारा आणि पुणे जिल्ह्यातील मागील दोन तीन महिन्यांत बैलगाडा शर्यतीदरम्यान अनेक ठिकाणी अपघात होवून अनेकांना आपला प्राण गमावण्याची वेळ आलेली आहे. या शर्यतींमधे अनेकजण पैशाच्या मोहातून जीवावर उदार होऊन गाडा चालकाचे काम करतात. मात्र हे करत असताना पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याने अपघात होवून गंभीर दुखापती किंवा जीव गमावण्याची वेळ अनेकांवर आलेली आहे. बैलगाडा मालकांचा हा शौक या तरुणांसाठी जीवघेणा ठरत आहे.