सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील लोहारे येथील स्मशानभूमीत सावडण्याचा विधी उरकून स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना उपस्थितांवर आग्या मोहाच्या पोळावरील मधमाशांनी हल्ला केल्याने महिला व पुरुष मिळून पंचवीस लोक जखमी झाले. सावडण्याचा विधीस यावेळी सत्तर लोक उपस्थित होते. ज्यांना मधमाशांनी दश केला आहे त्यांच्यावर वाईतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील चौघांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोहारे (ता वाई) येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांचा सावडण्याचा विधी आज होता. त्यासाठी त्यांचे आजूबाजूच्या गावातून नातेवाईक जमा झाले होते. सकाळी स्मशानभूमीत सावडण्याचा विधी सुरू होता. यावेळी कावळा शिवायला वेळ लागत होता. त्यामुळे परंपरेप्रमाणे स्मशानभूमीत गाईला आणून सावडण्याचा विधी पूर्ण करण्यात आला. हा विधी पूर्ण झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असताना मधमाशांनी उपस्थित यांवर हल्ला केला. त्यामुळे घाबरून सर्वजण सैरावैरा पळू लागले . त्यामुळे मधमाशा पिसाळल्या आणि त्यांनी पंचवीस जणांना दश केला. यामध्ये महिला व पुरुष नातेवाईकांची संख्या जास्त होती. त्यामुळे सर्वांना तातडीने वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. याची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून जखमींचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. जखमींमध्ये लोहारे आणि गुळंब (ता वाई) येथील नातेवाईकांची संख्या जास्त आहे.