व्यवसायाच्या फायद्यासाठी रस्त्यावरील दुभाजक तोडल्यास व्यावसायिकांवर होणार 'ही' कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी 
पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज घेतला. दरम्यान रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’  संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
           दरम्यान व्यवसायाला लाभ व्हावा यासाठी काही हॉटेलचालक तसेच अन्य व्यावसायिक मुख मार्गिका आणि सेवारस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवारस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस करावी. गरज पडल्यास संबंधितांचे व्यवसाय परवानेही रद्द करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनासाठीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले असून ते पोलीस विभागाच्या सॉफ्टवेअरशी जोडावेत, जेणेकरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
----------------
To Top