सोमेश्वर रिपोर्टर टीम----
जुन्नर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा ४३० फुटी वानरलिंगी सुळका टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करीत राजमाता अहिल्यादेवींना साहसी मानवंदना दिली.
या मोहिमेची सुरुवात नाणेघाट वस्ती, ता.जुन्नर, जि.पुणे येथुन झाली. दिड तासांची पायपीट केल्यावर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. आरोहणास सुरवात केल्यावर पहिला १०० फुटी मार्ग डावी कडे घेऊन जात पुन्हा उजवीकडे शिळा असलेल्या ठिकाणी घेऊन येतो. पुढील १०० फुटी मार्गात असणारा ओव्हरहँगचा कठीण टप्पा गिर्यारोहकांची परीक्षा घेणारा आहे. अखेरच्या टप्प्यात डावी कडे ६ फुट ट्रॅवर्स मारल्यावर शेवटचा २५ फुटी टप्पा पार करून शिखर गाठता येते.
शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील सरळसोट कठीण चढाई, ३०० फुटी रॅपलिंगचा थरार, पाहता क्षणीच मनात धडकी भरावी असे सुळक्याचे रांगडे रूप, एक चुकीचे पाऊल आणि खोल दरीतच विश्रांती असल्याने चुकीला माफी नाही असे हे ठिकाण, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या बनी शिंदे, जॅकी साळुंके, राजश्री चौधरी, भारत वडमारे, यश पवार, लव थोरे, मंदार मोहीले, राघवेंद्र गवंडळकर, इसाकीराजा कुमार, प्रतिक काशिलकर, सुषमा महाजन, रीना प्रजापती, अक्षय तळकुटे, कार्तिकेश सौरकर आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम सुरक्षितपणे फत्ते केली.