सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव शेळके- पाटील यांचे संचालकपद रद्द केल्याचा आदेश पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजय गोंदे यांनी दिला आहे. दरम्यान, या आदेशामध्ये त्यांनी संचालक शिवाजीराव शेळके-पाटील यांना या कारखान्याच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपेपर्यंत पुढील पाच वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढविण्यास अथवा स्वीकृत होण्यास पात्र ठरणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव शेळके- पाटील हे खंडाळा येथील ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई, शाखा खंडाळा या क्रेडिट सोसायटीचे कर्जदार व थकबाकीदार असल्याबाबतची तक्रार हर्षवर्धन शेळके (रा. लोणंद) यांनी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे तसा तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊन आज हा निकाल देण्यात आला आहे. दरम्यान, संचालक शिवाजीराव शेळके पाटील यांचे नावे या क्रेडिट सोसायटीचे ३६ लाख कर्ज असून, ते २७ लाख ५६ हजार ५९४ रुपये थकबाकीदार आहेत. खंडाळा येथील सहकारी सहायक निबंधक यांनी तसे वसुली प्रमाणपत्रही पारित केले आहे. त्यानुसार त्यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे येथील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.