खंडाळा ! आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

लोणंद : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा महत्त्वाचा सण दि. २९ जून रोजी एकाच दिवशी येत आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा मोठा उत्सव असतो. यंदा याच दिवशी बकरी ईदचा देखील सण आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद शहरात मुक्कामी असताना येथील मुस्लिम बांधव सामाजिक बांधिलकी जपत वारकरी बांधवांची सेवा करुन जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करित असतात यामुळे हा स्नेह जपत धार्मिक सहिष्णुता व एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी धार्मिक महत्त्व असलेला कुर्बानीचा कार्यक्रम पुढच्या दोन दिवसात करण्यात येईल असा निर्णय लोणंद मुस्लिम जमातीचे विश्वस्तांनी व समाज बांधवांनी घेतला आहे. 

           लोणंद पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शांतता समितीच्या बैठकीत सुद्धा मुस्लिम समाजाचे विश्वस्त व समाजबांधवांच्या मिटींगमध्ये ठरले प्रमाणे बकरी ईद दिवशी धार्मिक प्रार्थना म्हणजेच ईद ची नमाज अदा केली जाईल, कुर्बानीचा कार्यक्रम हा आषाढी एकादशीच्या दिवशी न करता धार्मिक परंपरेत सांगितल्याप्रमाणे पुढच्या दोन दिवसात केला जाईल व आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण शांततेत, आनंदात परस्पर स्नेह जपत गुण्यागोविंदाने साजरे करूयात अशी ग्वाही मुस्लिम बांधवांच्या वतीने देण्यात आली आहे, लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सदर निर्णयाचे स्वागत करुन समाजबांधवांचे आभार व्यक्त केले आहे . आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.

               यावेळी मुस्लिम समाजाचे विश्वस्त महंमदभाई कच्छी, जब्बारभाई पटेल, राजूभाई कुरेशी, असगर इनामदार  कय्युम मुल्ला, कायदेशीर सल्लागार ॲड.विलायत उर्फ बबलूभाई मणेर, नगरसेवक गणीभाई कच्छी,हिमालय फाउंडेशन चे सचिव जाविद पटेल, मार्गदर्शक महंमदभाई मुल्ला, पत्रकार राहिदभाई सय्यद, अशरफ इनामदार, इरफान पटेल आदी समाजबांधव उपस्थित होते.

----------------

कय्युम मुल्ला (विश्वस्त मुस्लिम जमात लोणंद):

लोणंद मुस्लिम बांधवांनी नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे गत वर्षांप्रमाणे यंदाही येथील समाज बांधवांनी आषाढी एकादशी या दिवशी कुर्बानी न देता त्या पुढील दोन दिवस कुर्बानी देऊन ईद-उल-अधा, बलिदानाची ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे, दोन्ही सण धार्मिक सहिष्णुता व एकमेकांच्या परंपरांचा आदर राखून शांततेत, आनंदात व परस्पर स्नेह जपत साजरे करूयात. आषाढी एकादशी व बकरी ईद (ईद-उल-अधा) च्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो.

To Top