सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
नियतीने कितीही अग्निपरीक्षा घेतली आणि परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपण आपल्या जिद्द, चिकाटीसोबतच बुद्धिमत्ता व अपार परिश्रमाचा बळावर इच्छित ध्येयापर्यंत सहज पोहचू शकतो याचीच अनुभूती दिली आहे भोरच्या जिजामाता विद्यालयातील दहावीची विध्यार्थिनी भुमिका दिक्षीतने.या विद्यार्थिनीने घरची परिस्थिती नाजूक असतानाही दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे.
भुमिकाच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची, वडील मिळेल ते काम करतात तर आई शिवणकाम. त्यातच भुमिकाला लहान दोन जुळी भावंड त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी सतत विस्कटलेलीच असे असतानाही आपल्या वाट्याला आलेले अठरा विश्व दारिद्र आपल्या मुलांना नको या भावनेने भूमिकाचे आई वडील अपार मेहनत करीत मुलांच्या शिक्षणाला प्रोस्ताहन देण्याचे काम करतात. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलीला महागडे शिक्षण देणे म्हणजे तारेवरची कसरतच तरी पण भुमिकाने या परिस्थितीचा कुठेही बाऊ न करता परिस्थितीची जाण ठेऊन अभ्यासात सातत्य राखले. परिश्रमपूर्वक व जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले.त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.