पुरंदर ! विजय लकडे ! नीरा शहरातील गल्लीबोळात बोकाळलीय अवैद्य सावकारी : टक्केवारीच्या बोजाखाली दबलेला ठरतोय सावकारी सावज

Admin
4 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा शहरातील अर्थव्यवस्थेला लागलेल्या अवैध सावकारीची प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
           ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका सहकारी सोसायटी, पतसंस्था, महिला व पुरुष बचत गट आणि कृषी बचत गट एवढे मोठे भांडवल पुरवठा करणारे अर्थव्यवस्थेचे जाळे असतानाही केवळ सुलभता व गतिमानता नसल्याने निरा येथे मजबूर असलेल्या गरजवंताची पावले समांतर अर्थव्यवस्था असलेल्या अवैध सावकारांच्या दाराकडे वळत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला लागलेल्या या अवैध सावकारीच्या किड्यांची पिचलेल्या व दबलेल्या कर्जदारावर प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या प्रति अर्थव्यवस्थेमध्ये अवैध पुरुष सावकारांच्या खांद्याला खांदा लावून अवैध महिला सावकार सुद्धा आघाडीवर आहेत.
          कोरोनामुळे बिघडलेले अर्थकारण, अवकाळी ने केलेला घात, लांबलेला पाऊस, गुरांचा लंप्पी आजार , शेतीमालाचे कोसळलेले बाजार, शेतीचा वाढलेला खर्च, रोजगारीतील मंदी, शिक्षण खर्च, लग्ने, ग्रामीण भागात असलेली धार्मिक व यात्रा फंड पद्धती, अचानक येणारी आजाराची संकटे तसेच व्यसनाधीनता आणि जुगार ही सर्व कारणे निरा येथे अवैध सावकारी फोफावण्यास पोषक ठरत आहेत.
कोठेच आशेचा किरण दिसत नसल्याने अडलेला नारायण अवैध सावकारांचे सावज  ठरत असून ते गरजवंताला कोंडीत पकडून याचना करणारा चे पाय बांधत आहेत. यामध्ये मोठे सावकार आपले नाव पुढे येऊ नये म्हणून थेट कर्ज न देता छोट्या सावकारा मार्फत देवाणघेवाण करीत आहेत. त्यामुळे व्याजदरात ५ टक्क्यापासून २५ टक्क्यापर्यंत वाढ होत आहे. दिलेल्या कर्जातून महिन्यातून फेड परंतु पहिला हप्ता व व्याज कर्ज देतानाच कापून घेतला जातो. हप्ता वेळेत न आल्यास  पुन्हा दंड. हे व्याजदर महिन्याचे आहेत. पुन्हा उपकार केल्याची भावना. अशा भरमसाठ व्याजदराचे घेतलेल्या पैशाने पैसे फिटता फिटत  नसल्याने घेणारा पुरता वाकून मोडला जातो तो पुन्हा सरळ झालेला पाहायला मिळत नाही.
         निरा येथे राजकीय व्यवस्था व अवैध सावकारी दोन्हीही एकमेकांवर अवलंबून एकमेका सहाय्य करू अशी स्थिती ही परिस्थिती पाहून तसेच दहशतीमुळे कोणी तक्रार करण्यास धजावत नाहीत. धाडस करून कोणी तक्रार करण्यास पाऊल टाकले तर राजकीय व्यवस्थे कडून राजकीय हस्तक्षेप होऊन आपले वजन वापरून अशी प्रकरणे मिटवली जाऊन अवैध सावकारांना पाठबळ दिले जात आहे. जेजुरी येथे काही दिवसांपूर्वी अवैध सावकारी व्यवसायाच्या वर्चस्वावरून प्रचंड जीवघेणी हाणामारी झाली होती. निरा शिव तक्रार गावात याहून वेगळी परिस्थिती नाही. अवैध  सावकारांच्या दहशतीमुळे काही अप्रिय घटनाही घडलेल्या आहेत. वेळप्रसंगी दहशत दाखवून मारहाणही होत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे रातोरात परागंदा झालेली आहेत. कर्जफेडीच्या कालावधीमध्ये अचानक आलेल्या संकटामुळे वेळेत कर्जफेड न झाल्याने अवैध सावकार दहशत दाखवून कर्जाच्या बोजlने पिचलेल्याचा  जीवन जगण्याचा आधार असलेली शेती, घरे आणि इतर मालमत्ता यांची खरेदी खते करून घेत आहेत.
        समर्थपणे कौटुंबिक जबाबदारी पेलता न आल्याने, तान तणाव आणि अवैध सावकारांची दहशत, दादागिरी , गलिच्छ भाषा शैली आणि कर्जामुळे  निर्माण झालेली व्यसनाधीनता यामुळे देशोधडीला लागून कुटुंबासमोर आणि मानसन्मान व पत असलेल्या जनमानसात मानहानी झाल्याने तसेच अवैध सावकारांच्या कर्जातून  बाहेर पडण्याचे सर्व मार्ग संपल्याने वैफल्यग्रस्त होऊन अवैध सावकार कडून अडलेल्या नारायणाची स्थिती रामभरोसेच दिसत आहे.
To Top