सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर - प्रतिनिधी
जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत हरघर हरजल ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेला केंद्र व राज्य सरकारचा निधी असल्याने राजकीय कार्यक्रम घेऊन मदनवाडी, शेळगाव येथील योजनांच्या भूमीपूजनाचा अजिबात अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसला नाही. विकासकामांचे खोटे श्रेय घेण्याची सवय आता तरी इंदापूरच्या आमदारांनी बंद करावी, अशी टीका भाजपचे इंदापूर तालुका अध्यक्ष अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी रविवारी केली आहे.
केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असल्याने आणि केंद्र-राज्य सरकारचा या योजनांसाठी निधी असल्याने मदनवाडी, शेळगाव येथील जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा अधिकार हा फक्त सरकारलाच आहे. सरकारच्या परस्पर शासकीय योजनांची भूमिपूजने करता येत नाहीत. मात्र श्रेय घेण्यासाठी रविवार, सोमवारी या भूमिपूजनांचा केविलवाना प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, आमदार करीत आहेत. शासकीय योजनांची परस्पर, संकेत न पाळता, बेकायदेशीरपणे उद्घाटन करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर का आली आहे, याचे आत्मपरीक्षण खासदार व आमदारांनी करावे, असा टोलाही अँड. शरद जामदार यांनी लगावला.
केंद्रत व राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवरती असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे माध्यमातून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्नातून इंदापूर तालुक्यासाठी आता कोट्यावधी रुपयांच्या निधीचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते श्रेय घेण्यासाठी मदनवाडी, शेळगाव येथील जल जीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेची बेकायदेशीरपणे भूमिपूजने करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना व दिशाभूलीस जनता फसणार नाही, असे यावेळी अँड. शरद जामदार यांनी नमूद केले.
----------------------------------------------