'सोमेश्वर रिपोर्टर' बातमीचा परिणाम ! नीरा-स्वारगेट बस उद्यापासून सुरू : सासवड आगाराकडून 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या बातमीची दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : विजय लकडे
आज सकाळी सोमेश्वर रिपोर्टर ने नीरा-स्वारगेट बस बंद करून सासवड आगर निरेकारांवर सूड उगवत आहे का? या मथ्यळ्याखाली बातमी प्रसिध्द केल्यानंतर सासवड आगाराने याची तात्काळ दाखल घेत गेले १५ दिवस बंद केलेली नीरा-स्वारगेट बस उद्या पासून सकाळी पावणे सहा ला सुरू होणार असल्याचे सासवड आगार प्रमुखांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या प्रतिनिधीशी संपर्क साधत माहिती दिली.
        निरा येथून पुण्याला जाण्यासाठी पहाटे लवकर असलेल्या सह्याद्री व मिरज पुणे पॅसेंजर या रेल्वे गाड्या बंद झाल्याने तसेच निरा हडपसर मार्गावर बहुउपयोगी ठरलेली पी एम पी एल सिटी बस सेवा बंद झाल्याने निरा येथून पुण्याला जाणारे विद्यार्थी, नोकरवर्ग, शेतकरी, ससून ला उपचाराला जाणारे गरीब रुग्ण, वकील वर्ग, पुण्याला जाऊन पुढे मुंबईला जाणारे प्रवासी आणि रोजगारासाठी जेजुरी एमआयडीसी ला जाणारे कामगार यांना सासवड आगाराची सकाळी पावणे सहाला निरा येथून सुटणारी  निरा- स्वारगेट ही एसटी बस मोठा आधार ठरत होती. कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा जाहीर न करता सकाळची निरा स्वारगेट ही एसटी बस आठ ते दहा दिवसापासून बंद झाल्याने निरा परिसरातील जनतेला  जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागून मिळेल त्या अवैध वाहनाचा वापर करावा लागत होता.
      सकाळी पावणे सहाची निरा -स्वारगेट ही एसटी बस पूर्ववत चालू व्हावी या मागणीसाठी निरा प्रवासी संघाचे टी.के. जगताप, पी. एल.निगडे, सुधीर शहा आणि सचिन मोरे यांनी जनहितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

याबाबत सोमेश्वर रिपोर्टर ने सासवड आगार प्रमुख... सकाळची पावणेसहाची एसटी बंद करून निरेकरावर सूड उगवत आहेत का? या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत सासवड आगार प्रमुख सागर गाडे, सासवड स्थानक प्रमुख प्रवीण माळशिकारे आणि वाहतूक नियंत्रक पोपट जैनक यांनी जनतेच्या मागणीची दखल घेऊन सर्व सोपस्कार पूर्ण करून तात्काळ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या प्रतिनिधीशी संपर्क साधून दि.२१ जून २०२३ पासून सकाळी पावणे सहाची निरा स्वारगेट ही बस सेवा पूर्ववत सुरू करीत आहोत असे कळविल्याने निरा परिसरातील प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
To Top