सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव - हेमंत गडकरी
एकीकडे चित्रपटांच्या व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधील पोस्टच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत असताना माळेगाव येथील मुस्लिम समाजातील तरुणांनी संत सोपानदेव महाराजांच्या पालखीत प्यार वाला शरबत वाटप करून हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्य व सहिष्णुता दाखवून दिली आहे.
विविधतेत एकता हीच खरी भारताची शक्ती आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काही समाज विघातक शक्तींनी हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालू केला आहे. द्वेष पूर्ण चित्रपट, व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधील फेक मेसेजेस फॉरवर्ड करत तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र माळेगाव येथील मुस्लिम तरुणांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. माळेगाव येथील मुस्लिम जामे जमात, मुस्लिम यंग सर्कल यांनी सुमारे पाचशे लिटर सरबत संत सोपानदेव महाराजांच्या वारीतील वारकऱ्यांसाठी दिला. याच सोबत शेकडो लिटर पिण्याचे शुद्ध पाणी व बिस्किट पुड्यांचे वाटपही केले. मुस्लिम समाज गुलाब पुष्प देऊन वारकरी भाविकांचे स्वागत करत होता हे चित्र जातीय विष पेरणाऱ्यांच्या कानाखाली दिलेली चपराक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माळेगाव येथील शकील सय्यद, शौकत शेख, रहमान शेख, वसीम शेख, युसूफ पठाण, असलम सय्यद, जावेद शेख, रसूल शेख, इसाक पठाण व मुस्लिम तरुणांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.