सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
आज सकाळी वाल्हे चा मुक्काम उरकून माऊलींचा पालखी सोहळा दुपारी १२ वाजता नीरा याठिकाणी येणार असून दुपारी एक वाजता माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातल्यानंतर सायंकाळी हा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी विसावणार आहे.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा आज १८ जुन रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. यावर्षी जिल्ह्यात पाच मुक्कामांसाठी पालखी सोहळ्याचे आगमन होते आहे. यापैकी पहिला अडीच दिवसाचा मुक्काम हा लोणंद येथे असणार आहे , तर पुढील मुक्कामासाठी लोणंद मधील मुक्काम आटोपल्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव हद्दीत माऊलींचे पहिले ऊभे रिंगण संपन्न होवून संध्याकाळी तरडगाव येथे वैष्णवांचा मेळा विसावेल .
जिल्ह्यात आगमन होताच पाडेगाव हद्दीत दत्तघाट येथे माऊलींच्या पादूकांना निरा स्नान होणार असुन त्यानंतर माऊलींचे स्वागत समता आश्रम शाळेसमोर सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मंडप उभारून सुशोभीकरण करण्यात आले आहे. यावेळी आगमन सोहळ्याला लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
सोहळा कालावधीत पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना जलद आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय मदत पथके व फिरती पथके कार्यरत असणार आहेत . याचबरोबर साथीचे आजार पसरू नयेत यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी , मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दिपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . त्यानंतर पालखी सोहळा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणंद शहरात पोहचल्यावर लोणंद नगरपंचायतच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येऊन माऊलींचे पालखी लोणंद मुक्कामाला पालखीतळावर विसावेल.